अनेक भाषांमध्ये संस्कृत भाषेचे योगदान महत्वाचे- डाॅ.इंदुराणी जाखड 

रत्नागिरी |
संस्कृत हा विषय अतिशय सुंदर विषय असून अनेक भाषांमध्ये संस्कृतचे योगदान महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ इंदुराणी जाखड यांनी केले.त्या माध्यमिक शिक्षण विभाग, शासकीय अध्यापक महाविद्यालय, जिल्हा संस्कृत शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्कृत गुणगौरव कार्यक्रमात बोलत होत्या.
डाॅ.जाखड यांनी संस्कृत भाषेचे महत्व अबाधित राखण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करु अशी ग्वाही दिली. डाॅ.जाखड यांच्या हस्ते माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेतील संस्कृत विषयात गुणवंत विद्यार्थ्याची प्रमाणपत्रे शिक्षकांकडे सुपूर्द करण्यात आली.
शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.रमा भोसले यांनी आयुर्वेदाचे ज्ञान हे संस्कृत भाषेत आहे. अनेक भाषांची जननी संस्कृत आहे.संस्कृत शिक्षक घडविण्यासाठी शासकीय अध्यापक महाविद्यालयात अभ्यासक्रम आणण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही  डाॅ.रमा भोसले यांनी दिली. माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव गणपती एडवी यांनी संस्कृत भाषा देवांची भाषा आहे.तुम्ही संस्कृत शिकविणारे शिक्षक भाग्यवान आहात अशा शब्दांत शिक्षकांचे कौतुक केले.
यावेळी डॉ राजश्री देशपांडे,  अध्यापक महाविद्यालय समन्वयक डाॅ.रमेश भोसले , संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा सौ.रेखा इनामदार, सचिव रवींद्र पाटणकर ,संस्कृत शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटणकर यांनी केले तर सौ.रेखा इनामदार यांनी आभार मानले.