छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरासाठी महामार्गाची ROW लाईंन निश्चित

आर्किटेक अमित कामत यांची माहिती

अतिक्रमण हटविण्याचा निर्णय प्रशासनाचा: उपनगराध्यक्ष बंडू हर्णे

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

कणकवली l चंद्रशेखर तांबट
कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलातरणाबाबत महामार्गाची आरओडब्ल्यू लाईन आज निश्चित करण्यात आली. तसेच या 18 गुंठे जागेची भूमी अभिलेख मार्फत मोजणी करून घेतल्यानंतर नायब तहसीलदार यांच्यामार्फत त्या 18 गुंठे जागेचा स्थळपाहणी पंचनामा करून अहवाल सादर करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. स्थळपाहणी दरम्यान या 18 गुंठे जागेत असलेली दुकाने, स्टॉल वन्य व अन्य बाबींची ही माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे. व त्यानंतर या बाबतचा अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांच्या आदेशाने नियुक्त केलेल्या आर्किटेक अमित कामत यांनी दिली.आज नगरपंचायत, महसूल विभाग, आर्किटेक यांच्या संयुक्त पाहणी दरम्यान महामार्ग प्राधिकारणने त्या 18 गुंठे जागे लगतची महामार्ग चौपदरीकरणाची आर ओ डब्लू लाईन निश्चित केली आहे. सदर 18 गुंठे जागेची मोजणी करून घेण्याबाबतही कार्यवाही करण्याबाबत मुख्याधिकार्‍यांना माहिती देण्यात आल्याचे श्री कामत यांनी सांगितले. अतिक्रमण हटवणे ही बाब प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने याबाबत प्रशासनच निर्णय घेईल अशी माहिती कणकवली उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली. हायवेच्या चौपदरीकरण आंतर्गत आर ओ डब्ल्यू मध्ये येत असलेली अतिक्रमणे हटवणे हा त्यांच्या अखत्यारीतील विषय आहे.

आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित झाल्यानंतर आता उर्वरित जागा तातडीने मोजणी करून घेण्याची सूचना आर्किटेक यांच्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाची सदर जागा असल्यामुळे भुमिअभिलेख ला सदर जागा मोजणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावे लागतील. त्यानंतर ती मोजणी तातडीने होऊ शकते असेही श्री हर्णे यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्र्यांनी यापूर्वी देखील एक महिन्यात हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रशासकीय अडचणी किंवा कामाच्या व्यापामुळे त्यांना शक्य झाले नसेल असा टोलाही श्री हर्णे यांनी लगावला. ओरोस येथे झालेल्या बैठकीत देखील शिवप्रेमींना पालकमंत्र्यांकडून एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे पुतळा स्थलांतरण प्रश्न केव्हा मार्गी निघेल हा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला तर चांगले ठरेल असेही श्री. हर्णे यांनी सांगितले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे झालेल्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरणाचा विषय चर्चेला आला होता. यावेळी पालकमंत्र्यांनी सदर पुतळा प. स. च्या शेजारील शासकीय 18 गुंठा जागेत बसवण्याचे निर्देश दिले होते. तसेच या पाहणी करिता 13 जानेवारी रोजी आर्किटेक पाठविण्याचे सांगितले होते. त्यानुसार आज सकाळी आर्किटेक श्री. कामत हे कणकवलीत दाखल झाले. त्यांच्यासोबत उप अभियंता महेश कट्टी, नायब तहसीलदार तानाजी रासम,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, शिवसेना नेते संदेश पारकर ,अतुल रावराणे, नगरसेवक संजय कामतेकर,माजी नगरसेवक किशोर राणे, मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील , महामार्ग प्राधिकरण महेश खाटीये,न.प.कर्मचारी किशोर धुमाळे,विभव करंदीकर, सचिन नेरकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे ,आनंद पारकर,भाई परब,महेश सावंत,कल्याण पारकर, शेखर राणे,सुशांत दळवी,बच्चू प्रभुगावकर,सुशील सावंत,मनोज हिर्लेकर, राजेंद्र चव्हाण,आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व स्थानिकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी आज फक्त आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित होणार असल्याचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांगितले. आर्किटेक कामत हे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीसाठी प्लॅन तयार करतील त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल असे सांगण्यात आले. यावेळी पंचायत समिती च्या बाजूला असलेल्या 18 गुंठे जागेतील सर्व बांधकाम व स्टॉल ची पाहणी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेली तीन वर्ष धोकादायक स्थितीत असून, यामुळे अनर्थ घडू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात दीपनाईक यांच्या फॅब्रिकेशन दुकानाजवळ पाचशे स्क्वेअर फुट जागेत तात्पुरत्या स्वरूपात पुतळा बसवण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ व सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आली होती. परंतु पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्पुर त्या स्वरूपातील पुतळ्याच्या स्थलांतरणाला परवानगी देऊ शकत नाही असे स्पष्ट करताना जर पुतळा त्याच ठिकाणी बसवायचा असेल तर संपूर्ण शासकीय जागा निश्चित करा अशा सूचना केल्या होत्या. तर ओरोस येथे झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद बांधकाम कार्यालय असलेल्या 23 गुंठे जागेवर छत्रपतींचे स्मारक करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांनी 18 गुंठे जागेत पुतळा व सुशोभीकरण करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज कार्यवाही सुरू करण्यात आली. मात्र या 18 गुंठे जागेतील दुकानदार व स्टॉलधारकांना विस्थापित करायचे झाल्यास त्यांच्या पुनर्वसनाबाबत झालेल्या चर्चेच्या संदर्भात पुढे काय निर्णय होणार ते पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे.