मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत सेनेच्या भूमिकेवर राष्ट्रवादीनेच व्यक्त केला संशय

सेना आमदार, माजी मंत्री बंडखोरांना मदत करतायेत, कारवाई करा; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
निकालाचे फटाके फुटण्याआधीच महाविकास आघाडीमध्ये धुसपूस

मंडणगड । प्रतिनिधी

महाविकास आघाडी म्हणून मंडणगड, दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितरित्या लढत असतानाहि आणि सेनेच्या बंडखोरांना मदत करणार नाही अशी घोषणा सेना आमदार योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी करूनही दोघांकडूनही अपक्षांना रसद पुरवली जात आहे. मात्र त्यांच्या या कृत्यावर शिवसेनेकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने आता महाविकास आघाडीमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हि आघाडी भक्कम आहे हे कार्यकर्त्यांना दाखवण्यासाठी आ. योगेश कदम यांच्यावर शिवसेनेने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक विधानसभा अध्यक्ष राकेश साळुंखे यांनी केली आहे.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना गुरुवारी त्यांनी पत्रकारांसमोर उघड केल्या. यावेळच्या मंडणगड आणि दापोली नगरपंचायतीच्या निवडणूक संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरली. स्थानिक स्वराज्य निवडणूकांचे मॉडेल म्हणून मंडणगड दापोली नगरपंचायतीमध्ये राज्य सरकारमधील महाविकास आघाडी स्थानिक स्तरावर सुद्धा केली असल्याची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या सभेत रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, माजी आमदार संजय कदम, माजी आमदार सुर्यकांत दळवी हे उपस्थित होते परंतु याच मतदार संघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम हेच या सभेला अनुपस्थित होते. याच सभेत पालकमंत्री परब यांनी सेनेचे माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे सुपुत्र आ. योगेश कदम यांच्यावर नाव न घेता टीका केली, त्यांच्या समर्थकांना शिवसेनेतील पदावरून पायउतार केले. कदम समर्थक शिवसैनिकांना डावलून अन्य लोकांना निवडणुकीचे तिकीट सुद्धा दिले. गद्दारांवर कारवाई करून महाविकास आघाडी म्हणूनच काम केले जाईल म्हणून सभेत शिवसेनेकडून गर्जना करण्यात आल्या. तर मंत्री परब यांनी संपूर्णपणे बाजूला करूनही शिवसेनेने डावललेल्या १३ पैकी ११ जणांनी अपक्ष निवडणूक लढवली तरी त्याला आम्ही प्रचाराला जाणार नाही अशी घोषणा कदम पितापुत्रांनी केली होती.

आता या निवडणुकीचा टप्पा १ संपला असून दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्याच भूमिकेवर संशय व्यक्त केल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या युवक विधानसभा अध्यक्ष राकेश साळुंखे यांनी पत्रकारांजवळ व्यक्त केलेल्या भावना स्फोटक ठरल्या आहेत.

राकेश साळुंखे म्हणाले कि नगरपंचायत निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या घोषणेच्या सभेत विद्यमान आमदार योगेश कदम उपस्थित नव्हते. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाआघाडी म्हणून संपूर्ण विश्वासाने शिवसेनेसोबत काम केले. मात्र यावेळी शिवसेनेचा एक नाराज गटाने 13 पैकी 11 जागांवर अपक्ष उमेदवार देवून पक्षांतर्गत गटबाजी दाखवून दिली. मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी व स्थानिक प्रभारी तालुका प्रमुख संतोष गोवळे व त्यांचे सहकारी यांनी सुर्यकांत दळवी व संजयराव कदम यांचे मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तमपणे एकत्रितपणे काम करून महाआघाडीचे काम केले. यावेळी शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम हे एकदाही प्रचारासाठी किंवा सहकार्यासाठी आलेले नव्हते. मात्र अपक्ष उमेदवारास मत देण्यासाठी काही प्रभागातील मतदार थेट त्यांचे बंगल्यावरून मतदानाला आल्याची चर्चा आमचे कार्यकर्ते करीत होते. त्यामुळे त्यांची त्यावेळची भुमिका संशयास्पद होती. मात्र महाआघाडीमध्ये काही अडचण येवू नये तसेच मतदारांमध्ये संभ्रम येवू नये म्हणून आम्ही त्यावेळी वरिष्ठांकडे याबाबत चर्चा केली नाही. यापूर्वी माजी मंत्री, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देखील या आघाडीचे प्रक्रीयेमध्ये सहभाग घेणार नाही असे जाहीर केले होते. त्यावेळी रामदास कदम हेही अपक्ष उमेदवारांसोबत चर्चा करताना आमचे कार्यकर्त्यांनी पाहीलेले आहे. याबाबत स्वतः प्रभारी तालुका प्रमुख गोवळे हे जाणत आहेत.

आता दुसऱ्या टप्प्यात मात्र विद्यमान आमदार स्वतः दिवसा ढवळया अपक्षाचा प्रचारासाठी मंडणगड नगरपंचायतीचे दारोदार जावून थेट प्रचार करीत आहेत. सेनेच्या मंत्र्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेत, विकास कामे व इतर बाबींची पत्रे मोबाईलवर मतदारांना दाखवून त्यांची दिशाभूल करण्याचा मोठा प्रयत्न करीत आहे. यामुळे आमचे राष्ट्रवादीचे आघाडीतील उमेदवार व शहरातील मतदारांमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांची भुमिका नकी काय ? व त्यांच्या अशा प्रकारामुळे त्यांच्याबाबत शिवसेना नक्की काय भुमिका घेणार ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे असे राकेश साळुंखे यावेळी म्हणाले.

नागरिकांमधील हा संभ्रम संपवायचा असेल तर पालकमंत्री अनिल परब यांनी १८ जानेवारी या मतदानाच्या दिवसापूर्वीच महाविकास आघाडीविरोधात काम करणाऱ्या आमदार योगेश कदम यांच्यर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी राकेश साळुंखे यांनी केली आहे. यातून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला संदेश जाईल आणि आगामी पंचायत समिती, जिल्हा परीषद निवडणूकांमध्ये अशा चुकीचा प्रकार करण्याची धमक दोन्ही पक्षामध्ये कोणी करणार नाही व एक उत्तम व सशक्त ताकत या मतदार संघात तयार होईल अशी मागणी केली आहे.