अशी ही बनवा बनवी…!

पत्रकार कक्षातून | संतोष वायंगणकर

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन व विकासमंडळाची सोमवार १० जानेवारी रोजी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला नियोजन मंडळ सदस्यांना सभागृहात प्रवेश देण्यावरून सुरूवातीलाच प्रशासन आणि सदस्य यांच्यात वादंग झाला. जि.प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर व काही सदस्य यांनी प्रवेश द्या अशी मागणी केली. परंतु ऑनलाईन सहभागी व्हावे असे सूचविण्यात आले. जिल्हा नियोजन मंडळाची बैठक नेहमीच वादळी ठरते. सत्ताधारी पालकमंत्र्यांकडून जिल्हा परिषद व नियोजन मंडळ सदस्यांकडून काम डावलण्याचे प्रकार घडतात. यावरून यापूर्वीही सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांना यादी बदलावरून सदस्यांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागले. आजच्या बैठकीतही नियोजन मंडळ सदस्य रणजित देसाई यांनी जोरदार आक्षेप घेतला. २०२१-२२ चा नियोजन व विकास आराखडा राज्य नियोजन विभागाकडे २६५ कोटी रूपयांचा आराखडा पाठविण्याचे ठरले. आणि सिंधुदुर्ग विकासासाठी ५०५ कोटी रूपये मागणी करायची असे ठरले. यातच फारमोठी गंमत आहे. याच २६५ कोटी रूपयात गतवर्षीचे जिल्हा परिषदेचे शासनाकडे परत गेलेले ४० कोटी आणि गतवर्षीच्या मागील कामांच्या दायीत्वातील १२० कोटी रूपये म्हणजे १६० कोटी रूपये हे मागील रक्कम आहे. याचा अर्थ सरळ-सरळ असा होतो की, २०२२-२३ साल चा नियोजन आराखडा हा १०५ कोटी रूपयांचा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विकासासाठी ५०५ कोटी रूपयांची जरी मागणी करण्यात आली आहे. ही वस्तुस्थिती असली तरीही राज्यसरकारकडे आराखडा मात्र २६५ कोटींचा सादर करण्यात आला आहे. यात मागील येणे असलेल्या रक्कमेचाही समावेश आहे. हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचे सावट असल्याने राज्यसरकारकडून काही निधी मिळण्याची शक्यता नाही. पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा नियोजन मंडळ सदस्य रणजित देसाई यांच्यात खडाजंगी झाली. या ऑनलाईन बैठकीत आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे यांनीही आपया सूचविलेली काम वगळू नयेत असे सांगितले. माजी जिल्हा परिषद सभापती आणि जिल्हा नियोजन मंडळ सदस्य विकासभाई सावंत यांनी जिल्हा नियोजन मंडळच्या कामांची यादी कशी सदोष आहे हे सांगितले. जी कामं झाली आहेत ती कामंही या यादीत समाविष्ट आहेत हे अयोग्य आहे. पूर्वीच्या कामांची यादी अधिकारी तशीच ठेवतात हे योग्य नाही. या बैठकीत जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी सहभागी होत्या. सौ. सावंत यांनी सांगितले की, चुकीच्या पद्धतीने काही घडू देणार नाही. ऑनलाईन बैठकीत नेटवर्कची समस्या होती. यामुळे अनेकवेळा या बैठकीत काय चाललय हे समजत नव्हते. जिल्हा नियोजन मंडळ सदस्य दादा कुबल आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, नेटवर्क प्रॉब्लेममुळे त्यांचा नीट संवाद होत नव्हता. आपला संवाद होऊ नये, आपणाला बोलायला मिळू नये यासाठी ‘म्युट‘ करून ठेवण्यात येत असल्याचा आरोप सदस्य दादा कुबल यांनी केला. या ऑनलाईन नियोजन मंडळ बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका सभागृहात स्क्रीन लावून तेथे व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, अनेकवेळा या बैठकीचे कामकाज नीट पहाता ऐकता येत नव्हते. ऑनलाईन चाललेली ही बैठक तासभर वेळात गुंडाळण्यात पालकमंत्री ना. उदय सामंत यशस्वी झाले. या बैठकीत सदस्या जान्हवी सावंत, रोहीणी गावडे यांनीही सहभाग घेतला.
जाता-जाता :
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत, माजी राज्यमंत्री आ. दिपक केसरकर यांना सांभाळत असल्याचे दिसून येत होते. राज्य मंत्रीमंडळातून बाजुला केलेले आ. दिपक केसरकर अस्वस्थ आहेत. आ. केसरकर फार दुखावले गेले आहेत. ‘सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी काहीशी त्यांची विचित्र अवस्था आहे. की अस्वस्थता नाराजी अधून-मधून आ.दिपक केसरकर काढत असतात. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक निकालानंतर पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यावरही त्यांनी असेच तोंडसुख घेतले. यामुळेच आजच्या नियोजन मंडळ बैठकीत ना. उदय सामंत, आ.दिपक केसरकर यांना चुचकारण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. सिंधु-रत्न योजनेतील निधी, चांदा ते बांदा चा उल्लेख यातूनच ते अधोरेखित होत होते. नियोजन मंडळ बैठकीतील कोट्यवधींची चर्चा म्हणजे ‘दिले कोणी आणि घेतले कोणी’ अशीच होती.

जाहिरात4