जेष्ठांच्या क्रिकेट स्पर्धेत निरवडे – कोनापाल संघाची बाजी

क्षेत्रपालेश्वर होडावडा संघ उपविजेता

दत्तप्रसाद संघातर्फे आयोजित स्नेहमेळावा ठरला यादगार

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

सावंतवाडी । प्रतिनिधी : दत्तप्रसाद क्रिकेट संघ मळगांव आयोजित जेष्ठ क्रिकेटपटूंचा स्नेहमेळावा यादगार ठरला. मळगाव पंचक्रोशीतील जुन्या-जाणत्या खेळाडू खेळाडूंनी बऱ्याच काळानंतर एकत्र येत खेळ, मनोरंजन व स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेत क्षेत्रपालेश्वर होडावडा संघावर मात करीत निरवडे – कोनापाल संघाने बाजी मारली.

एकेकाळी आपल्या गोलंदाजी फलंदाजी व क्षेत्ररक्षणाने क्रिकेट स्पर्धांची मैदाने गाजविणाऱ्या मळगाव पंचक्रोशीतील मळगांव, निरवडे – कोनापाल, तळवडे, होडावडा या गावातील जेष्ठ क्रिकेटपटूंना एकत्र आणण्याची किमया साधली ती मळगांव येथील दत्त प्रसाद क्रिकेट संघाने. अगदी वयाची पासष्टी पार केलेल्या होडावडा येथील प्रताप नाईक यांच्यासह नोकरी-धंद्यानिमित्त पुणे मुंबई सारख्या शहरात स्थायिक झालेल्या अनेक खेळाडूंनी एकत्र येत पुन्हा मैदान गाजवले. निमित्त होते ते दत्तप्रसाद मळगाव आयोजित ज्येष्ठ क्रिकेटपटूंच्या स्नेहमेळाव्याचे.

आज ज्या वयात खेळणं तर सोडाच पण पळणं देखील अवघड होत आहे अशा अनेक खेळाडूंनी आपल्या जुन्याच खेळाचे प्रदर्शन करित तरुणांसमोर नवा आदर्श निर्माण केला. ‘आज भी हम जवान है ‘ हेच जणू त्यांनी सिद्ध केलं. चौकार षटकार धावा याचबरोबर गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातही चुणूक दाखवत ‘हम किसीसे कम नही ‘ याची प्रचिती दिली. अनेकांनी तर २० वर्षांपूर्वी क्रिकेट सोडले होते मात्र त्यांचा उत्साह तेवढाच दिसून आला.

या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित ज्येष्ठांच्या क्रिकेट स्पर्धेत निरवडे कोनापाल संघ अंतिम विजेता ठरला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या अंतिम सामन्यात निरवडे संघाच्या संदेश बांदिवडेकर यांनी विजयी धाव घेत आपल्या संघाला यश प्राप्त करून दिले. तर निरवडेच्या बाजूने सामना एकतर्फी झुकत असताना क्षेत्रपालेश्वर होडावडा संघाचे कर्णधार मोहन जाधव यांनी स्वतः गोलंदाजीची सूत्रे हातात घेत शेवटच्या चेंडूपर्यंत कडवी झुंज दिली.

क्षेत्र पालेश्वर संघ उपविजेता ठरला तर दत्त प्रसाद मळगाव संघ तिसऱ्या बक्षिसाचा मानकरी ठरला. या स्पर्धेत पंच म्हणून राहुल गोसावी व विनय पेडणेकर यांनी काम पाहिले. तर संजय हळदणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्नेह मेळाव्यासाठी उत्कृष्ट व लज्जतदार स्नेह भोजनाचा आस्वाद दिला.

या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने अनेक खेळाडूंनी आपल्या गतस्मृती जागवल्या. या वेळी मैदानात व मैदानाबाहेर घडलेले अनेक किस्से व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एकेकाळी एकमेकाचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मळगाव व होडावडे संघातील खेळाडू एकत्रितपणे स्नेह मिळाल्याचा आनंद लुटताना दिसले. मैदानावरील खेळातही कोणतीही स्पर्धा न करता क्रिकेटचा आनंदच जणू सर्वांनी लुटला. शरीर थकले असले तरीही मनाचा उत्साह दांडगा असल्याने मैदानात सर्वच खेळाडू पुन्हा एकदा नव्या दमाने खेळताना पाहायला मिळाले.

या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधताना त्यांनी मळगाव येथे सुरू केलेल्या पोलीस भरती अकादमी विषयी सविस्तर माहिती दिली. एकेकाळी दत्तप्रसाद क्रिकेट संघातून हौशी क्रिकेट खेळणाऱ्या गवस यांनी फिटनेसचे महत्व पटवून दिले.आज मोबाईलच्या जमान्यात आपली मुले कशी मैदानापासून दूर जात आहेत त्याची व्यथा त्यांनी मांडली. तसेच आपल्या पाल्यांना प्रशासकीय सेवेत दाखल करण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत यासाठी आपले सहकारी संजू पै यांसह अकादमीच्या माध्यमातू सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

दत्तप्रसादचे क्रिकेटपटू तथा कोकण रेल्वेचे अभियंता सुधीर गोसावी यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्नेह मेळाव्याला त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मूर्त रूप दिले. आज वेगवेगळ्या मोठ्या हुद्द्यावर व व्यवसायात असलेल्या सर्व खेळाडूंनी आपल्या पदांचा व मानाचा कोणताही बडेजाव न करता खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करीत
सांघिक खेळ व स्नेहाचे संबंध दृढ केले. आपल्यातून निघून गेलेल्या काही सहकाऱ्यांच्या स्मृतींना ही यावेळी अभिवादन करण्यात आले.
क्रिकेट स्पर्धा, चर्चासत्र, प्रश्नमंजुषा स्नेहभोजन व परस्परांमधील संवाद व आठवणींच्या आदान प्रदानामूळे हा स्नेहमेळावा यादगार ठरला.

या मेळाव्यात मळगाव दत्तप्रसाद संघातील ज्येष्ठ खेळाडू सुधीर गोसावी, अन्थोन फर्नांडीस, प्रा. शरद शिरोडकर, सुधाकर नाईक, समीर परब, संतोष नार्वेकर, बाळू गांवकर, प्रकाश नार्वेकर, विलास केणी, दाजी देवळी, संजय धुरी, सचिन रेडकर, हनुमंत पेडणेकर, अशोक कुडव, बाळू मेस्त्री, सुधा मेस्त्री, संदेश राऊळ, मुरलीधर गवंडे, बाळा जोशी, मनिष तेली, देवानंद नार्वेकर, आनंद मिशाळ, बाबी देवळी, दिवाकर खानोलकर, भाऊ कांबळी, बाळू गावडे यांच्यासह निरवडे कोनापालचे प्रमोद गावडे, विजय गावडे, महेंद्र कोरगांवकर, संदेश बांदिवडेकर, महेश बांदिवडेकर, अरुण तानावडे, गजानन जाधव, दिनकर गावडे, होडावडा संघाचे जूने जाणते खेळाडू मोहन जाधव, प्रताप नाईक, संजू पै, मदन केरकर, देवेंद्र जाधव, विलास मालवणकर, राजन पेडणेकर, हरी परब, गावीत सर, पावणोजी, तुकाराम परब, देवा परब, शामिल तर तळवडेचे संतोष रेडकर, अनिल जाधव, बाळू मालवणकर, सुधीर सावंत, सर्वेश रेडकर, राजन कोरगांवकर यांच्यासह अनेक जुने जाणते जेष्ठ खेळाडू या स्नेहमेळावा व स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.