रत्नागिरीतील धाडसी तरुणांनी सर केला रायगडमधील कळकराय सुळका आणि ढाक भैरी मधील अवघड गुहा

रत्नागिरी । प्रतिनिधी
साहसी व अत्यंत कठीण श्रेणीत मोडणारा रायगड जिल्ह्यातील कर्जत मधील ढाक भैरी मधील गुहा आणि याच किल्ल्याजवळ असलेला कळकराय सुळका रत्नागिरीतील 10 साहसी तरूणांच्या चमुने नुकताच सर केला.

अस म्हणतात की ढाक भैरीला जाण म्हणजे साक्षात मृत्युला आमंत्रण देणं. परंतु या ठिकाणी ज्यांना साहसाच वेड लागलेल असतं ते भटके जातातच जातात. अशाच रत्नागिरीतील जिद्दी माउंटेनेरिंगचे भटके धिरज पाटकर, अरविंद नवेले, उमेश गोठिवरेकर, आकाश नाईक, कु.प्राची नाईक, मंदार सावंत, दिनेश आग्रे, शक्ती नागवेकर, कौस्तुभ पड्यार, परेश बाम आणि या चमुमध्ये सांगली येथुन खास सहभागी झालेले इंद्रजित खंडागळे यांनी भाग घेतला होता. या मध्ये एकमेव कु. प्राची नाईक या तरूणीने सहभाग घेतला होता. हे या धाडसी मोहिमेचे खास वैशिष्ट्य होते.

या किल्ल्यावर कर्जंत वरून सांडशी या गावातुन जातात. यासाठी अनेक डोंगर पार करत या ठिकाणी पोहोचायला जवळजवळ 5 तास लागतात. रत्नागिरीच्या चमुने या सांडशी गावातुन या किल्ल्यापर्यंतचा प्रवास केला. सकाळी 9 वाजता या ट्रेकची सांडशी गावातून सुरवात झाली. अवघड असे अनेक डोंगर कपा-यांच्या अडथळ्यांना पार करत 5 तास चालल्यानंतर दुपारी 2.30 वा. रत्नागिरीच्या या चमुला ढाकच्या पायथ्याशी पोहोचण्यात यश आले. यानंतर या ढाक्या गुहेमध्ये जाण्यासाठी सरसोट 90 अंशाची चढाई सुरू झाली. सर्वजण या गुहेत 3.30 ला पोहोचल्या नंतर तिथे थोडावेळ थांबुन पुन्हा त्याच मार्गाने 90 अंशात खाली उतरण्याचा अतिशय खतरनाक असा उलटा प्रवास करत पुन्हा हा चमु ढाकच्या पायथ्याथी असलेल्या गुहेत रात्रीच्या मुक्कामाला थांबला.

याच ढाकच्या किल्ल्याच्या जवळच असलेला कळकराय या सुळक्यावर दुस-या दिवशी सकाळी 3.30 वा उठून पहाटे या चमुने 6 वाजता चढाई ( क्लायंबिंग) करण्यास सुरवात केली. या मोहिमेचे लिडर अरविंद नवेले यांनी लिड करत रोप फिक्स करत पुढे गेले त्यांना आकाश नाईक यांनी मदत केली, त्यांच्या पाठोपाठ उमेश गोठिवरेकर यांनी चढाई केली. अशा प्रकारे एका मागुन एक चढाई करत या सुळक्याच्या माथ्यावर सकाळी 11 वा. सर्वांनी पाय रोवला. या सुळक्यावर पोहोचल्यावर थोड्याच वेळात सुळक्याच्या माथ्यावरून त्याच्या पायथ्यापर्यंत रॅपलिंग करत उतरण्यात आले आणि त्यानंतर या तरूणांच्या या धाडसी मोहिमेची सांगता झाली. या सुळक्याची उंची 200 फुटापर्यंत असुन या ठिकाणी सकाळी प्रचंड वेगाने वारे वहातात. या वा-यांचा वेग ताशी 100 ते 150 इतका असताना देखील या धाडसी तरूणांनी या सुळक्यावर केलेली चढाई एक वैशिष्ठच म्हणावे लागेल.

ढाक बहिरी हा रायगड जिल्ह्यातील सांडशी गावात स्तिथ बुलंद असा एक किल्ला आहे. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असणार्‍या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असे म्हणतात. हा किल्ला रहिवासी ठाकूर आदिवासींच्या दैवत बहिरी देवांना समर्पित आहे म्हणूनच त्याला ढाक बहिरी असे म्हणतात. या बहिरीच्या गुहेत बहिरीचा शेंदुर फासलेला दगड आहे. बहिरीचा वापर आजूबाजूच्या ( राजमाची) किल्यावर पहारा देण्यासाठी केला जायचा. ढाक बहिरी किल्ला आणि या किल्ल्याच्या जवळच असणारा कळकराय हा सुळका इतिहास प्रेमी, गिर्यारोहक, साहस प्रेमी यांना आकर्षित करतो. कर्जत डोंगररांगेत येणारा हा ट्रेकर्सच्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जातो. ढाक भैरीला जाताना प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेचा जणू कस लागतो. आजकाल बरेच जण अर्धवट माहितीच्या आधारे किंवा साहस करण्याच्या उद्देशाने ढाकच्या किल्ल्यावर जातात. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. यापूर्वी अनेक जणांचा या ठिकाणी पडून मृत्यु झालेला आहे.

ढाक किल्ल्यावरील कातळाच्या पोटात ३ लेणी खोदलेली आहेत. येथपर्यंत जाण्यासाठी अवघड कातळ टप्पा पार करावा लागतो. गुहेमध्ये पाण्याची २ मोठी टाक आहेत. यातील एका टाक्यामधील पाणी पिण्यासाठी वापरतात तर यातील दुस-या टाक्यांमध्ये गावक-यांनी जेवणासाठी व जेवण बनवण्यासाठी काही भांडी ठेवली आहेत. जेवण झाल्यावर ही भांडी धुवून पुन्हा या टाक्यातच ठेवली जातात. गुहेच्या वर दीड हजार फूटांची कातळभिंत आहे. गुहेच्या समोरच राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक , प्रबळगड , कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो. दुसर्‍या लेण्यात काहीही अवशेष नाहीत ,तर ३ रे लेणे अर्धवट खोदलेल्या स्थितीत आहे.

ढाक बहिरीला पोचण्‍यासाठी पुणे – कामशेत – जांभिवली या मार्गाने, जांभिवली गावापर्यंत जाता येते. तेथून पुढे अर्धा ते पाऊण तास चालल्‍यानंतर कोंडेश्‍वर मंदिर लागते. तेथून जंगलवाट सुरू होते. त्‍या वाटेने पुढे गेल्‍यानंतर एक चिंचोळी 90 अंशा मधे उभी असणारी खिंड लागते. ही खिंड ढाकचा किल्‍ला आणि सरळसोट उभा कळकरायचा सुळका यांच्‍या मधोमध आहे. खिंड आठ ते दहा मीटर लांब आहे. खिंड उरण्यासाठी जाडजूड लोखंडी साखळ्या व रोप लावण्यात आले आहेत. खिंड पार केल्यावर पुढे कातळकडा लागतो. तो चढत असताना दोरखंडाचा वापर करावा. तो कडा पार करणे अवघड आहे. अतिउत्साही पणे जाऊन किंवा कोणत्याही सुरक्षिततेच्या साधनसामुग्री शिवाय जाऊ नये.

जाहिरात4