23 लाख लुटीचा वैभववाडी पोलिसांनी 24 तासात लावला छडा

पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र होतेय कौतुक

वैभववाडी । नरेंद्र कोलते
पोलिसांनी योग्य दिशेने फिरवलेली तपासाची चक्रे व दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर 23 लाख चोरीचा धक्कादायक खुलासा पोलिसांसमोर आला आहे. एटीएम मध्ये पैसे डिपॉझिट करणाऱ्या कंपनीच्या त्या दोन कर्मचाऱ्यांनीच हा चोरीचा बनाव रचल्याची कबुली त्यांनी पोलीसांना दिली आहे. मात्र या लुटमारी प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 24 तासात पोलिसांना या चोरीच्या घटनेचा छडा लावण्यात यश आले आहे. पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चोरीच्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. जिल्हा पोलीस यंत्रणा देखील घटनेने हादरून गेली होती. या घटनेच्या तपासाची गती वैभववाडी पोलिसांनी सुरुवातीपासून वाढविली. बुधवारी दिवसभर कसून तपास वैभववाडी पोलिस करत होते. फिर्यादी विठ्ठल खरात व सगुण केरवडेकर हे मंगळवार पासून वैभववाडी पोलीसांच्या ताब्यात होते. त्यांचीदेखील पोलिसांकडून कसून चौकशी सुरू होती. बुधवारी सायंकाळी पुन्हा फिर्यादी खरात व केरवडेकर यांना पोलिस घटनास्थळी घेऊन गेले होते. चोरट्यांनी मोटरसायकल कशी आडवली. लाथ कशी मारली. कुठच्या दिशेला ढकलले. गाडी कोणाच्या अंगावर होती. मिरची पावडर कशी फेकली. ते चोरटे कुठल्या दिशेने पसार झाले. दरम्यान कोणती वाहने या ठिकाणाहून मार्गस्थ झाली. त्याची कसून चौकशी पोलीस करत होते. पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. फिर्यादी कडून मिळालेल्या माहितीवरुन हा सगळा बनाव असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्या दोन्ही फिर्यादीना पुन्हा वैभववाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
मंगळवारी दुपारी बँक ऑफ इंडिया एटीएमची 23 लाख इतकी रक्कम घेऊन फिर्यादी कणकवलीहुन वैभववाडीकडे निघाले होते. दोन्ही फिर्यादी हे सेक्युलर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड कंपनी चे कर्मचारी आहेत. गेली चार वर्षे ते या कंपनीत कार्यरत आहेत. एटीएम मध्ये पैसे डिपॉझिट करणे हेच कंपनीचे प्रमुख काम आहे. फिर्यादी तरेळे ते वैभववाडी असा प्रवास करत होते. दरम्यान कोकिसरे बांधवाडी घंगाळेवाडी दरम्यान पाठीमागून मोटरसायकलवरून दोघे आले. त्यांनी फिर्यादीच्या गाडीवर लाथ मारली. व मिरची पावडर डोळ्यात फेकत त्यांच्याकडून 23 लाख रुपये भरलेली बँग हिसकावून घेतली. व ते पुन्हा तरेळेच्या दिशेने पसार झाले. अशी माहिती फिर्यादी कडून पोलिसांना प्राप्त झाली होती. या घटनेने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. जिल्हा पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा अन्वेषणचे पथक वैभववाडीत तळ ठोकून बसले होते.
पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर यांनी घटनास्थळी व वैभववाडी पोलिस ठाण्याला भेट दिली. व घटनेचा आढावा जाणून घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली पो. नि. अतुल जाधव, उपनिरीक्षक प्रवीण देसाई हे बुधवारी दिवसभर या घटनेचा तपास करत होते.
तरेळे – वैभववाडी मार्गावर कोकिसरे रेल्वे फाटक आहे. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. तसेच तरेळे येथील खाजगी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. या मार्गावरून बाहेर पडण्यासाठी नाधवडे शिडवणे फाटा, व नापणे रेल्वे स्टेशन फाटा हे दोन मार्ग आहेत. सर्व दिशेने वैभववाडी पोलिसांनी तपास केला.
बुधवारी सायंकाळी वैभववाडी पोलीस ठाण्यात तपासादरम्यान फिर्यादी खरात व केरवडेकर यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेत आणखी काही जणांचा समावेश असल्याचे पोलिसांना संशयित आरोपी यांनी सांगितले आहे. चोरीची ती रक्कम आपल्याकडे नसून ती तिसऱ्या व्यक्तीकडे असल्याचे त्या संशयितांनी पोलिसांना सांगितले आहे. वैभववाडी पोलीस त्या दोन संशयित आरोपींना घेऊन अन्य आरोपींच्या शोधास लागले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अतुल जाधव करत आहेत.