कुंभवडे प्राथ. आरोग्य केंद्राच्या निकृष्ट कामाकडे लक्ष वेधण्यासाठी संदिप पांचाळ यांचा आमरण उपोषणाचा ईशारा

राजापूर | वार्ताहर :

कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्ती व नुतनीकरण काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून याप्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आमरण उपोषणास बसण्याचा ईशारा ग्रामस्थ संदिप नारायण पांचाळ यांनी दिला आहे. तसे पत्र त्यांनी उपविभागीय अधिकारी राजापूर यांना दिले आहे.

कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्ती व नुतनीकरणासाठी १८ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. सन २०१८ साली या कामाची सुरूवात करण्यात आली. मात्र सन २०२१ साल उजाडले तरी हे काम पुर्ण झालेले नाही. शिवाय दुरूस्ती करताना जुन्या इमारतीच्याच खिडक्या व दरवाजे लावण्यात आले असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप संदिप पांचाळ यांनी केला आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट कामाबाबत आपण ग्रामसभेत विचारणा केली असताना उपसरपंच पंढरीनाथ मयेकर यांनी कबुली देवून पुर्वी झालेल्या चुकांची दुरूस्ती करून देण्याचे आश्वासन दिले होते. तसा ठरावही ग्रामसभेत करण्यात आला आहे. मात्र या घटनेलाही आता महिना उलटला तरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम अपुरे असून निकृष्ट साहित्य जैसे थे असल्याचे पांचाळ यांनी यांनी म्हटले आहे.

त्यामुळे या निकृ ष्ट कामाला ग्रामपंचायत प्रशासनाचा वरदहस्त तर नाही ना असा प्रश्न पांचाळ यांनी विचारला असून या प्रकरणी चौकशी होवून संबधितावर कारवाई व्हावी यासाठी आता पांचाळ यांनी उपोषणास बसण्याचा ईशारा दिला आहे.