चिपी विमानतळावर राणेच भारी…

इंडिया कॉलिंग |सुकृत खांडेकर :

कोकणातील पहिल्या आणि एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे नारायण राणे यांचे स्वप्न तब्बल तीन दशकांच्या अथक परिश्रमानंतर साकार झाले. सिंधुदुर्गमधून १९९० मध्ये विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी या जिल्ह्याच्या आणि कोकणाच्या विकासाला वाहून घेतले आहे. कोकण विकासाचे कंकण बांधणारा लोकप्रतिनिधी या भावनेतून त्यांनी येथील लोकांसाठी अखंड काम केले व आजही करीत आहेत. तीन महिन्यांपूर्वी जुलै २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला आणि त्यांच्याकडे लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची सूत्रे हाती सोपवली. देशातील ऐंशी टक्के उद्योग राणे यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात.

महाराष्ट्रात आणि कोकणात जास्तीत जास्त उद्योग कसे आणता येतील व जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, यासाठी त्यांनी पहिल्या दिवसांपासूनच अभ्यासाला सुरुवात केली. कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी विमानतळ मार्गी लागणे हा एक सर्वोच्च अग्रक्रम असलेला त्यांचा अजेंडा होता. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ते नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटायला गेले आणि सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ लवकरात लवकर सुरू करावा, अशी त्यांनी विनंती केली. राणेसाहेबांची विनंती ज्योतिरादित्य यांनी तत्काळ मान्य केलीच, पण उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू असे सांगितले. कोणत्या तारखेला उद्घाटन करायचे, हेही या भेटीत निश्चित झाले. मी त्या दिवशी प्रहारच्या मुंबई कार्यालयात बसलो होतो, सायंकाळी दिल्लीहून राणेसाहेबांचा माझ्या मोबाईलवर फोन आला. आपण ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ऑफिसमधून बाहेर पडतोय. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला ते स्वतः हजर राहणार आणि त्याची तारीखही ठरली… ते बोलले. समाधान आणि आनंद त्यांच्या बोलण्यातून मला जाणवला.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सर्व मराठी वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपित केला. या कार्यक्रमात राणे विरुद्ध ठाकरे अशी जुगलबंदी होणार, असे अपेक्षित होते आणि नेमके तसेच घडले. या विमानतळाचे भूमिपूजन १५ ऑगस्ट २००९ रोजी झाले, तेव्हा शिवसेनेचे लोकप्रतिनिधी तेथे विरोध करण्यासाठी हजर होते. ज्यांनी विमानतळाला विरोध केला तेच चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर हजर होते. ज्यांनी विरोध केला, तेच विमानतळाचे श्रेय़ घेण्यासाठी कसे मिरवत आहेत, हे राणे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला दाखवून दिले. त्यावेळी वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेली कात्रणेही राणेसाहेबांनी हातात धरून दाखवली. शिवसेनेने विकासाच्या प्रकल्पांना यापूर्वीही अनेकदा अनेक ठिकाणी विरोध केला आहे. स्थानिक जनतेचा विरोध असेल, तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असा युक्तिवाद सेनेने त्यासाठी केला होता. पण नंतर असे प्रकल्प मार्गी लागल्याचीही उदाहरणे आहेत.

जे विरोध करतात ते श्रेय घेण्यासाठी पुढे कसे, हाच नेमका राणे यांचा सवाल होता. तो काही त्यांनी लपून-छपून केला नाही, तर सर्वांसमक्ष केला.उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे अर्धा डझन मंत्री तरी हजर होते. चिपी विमानतळाचे श्रेय नारायण राणे यांना मिळता कामा नये, यासाठी सर्वांची धडपड होती. हे त्यांच्या  उपस्थितीतून जाणवत होते. शिवसेनेत असताना शिवसेनाप्रमुखांच्या सांगण्यावरूनच आपण सिंधुदुर्गमधून विधानसभेची निवडणूक लढवली व त्यांच्या प्रेरणेतूनच या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न केला, असे राणे यांनी सांगितले. आपण केलेल्या विकासकामांचे श्रेय त्यांनी शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या प्रेरणेला दिले. त्यासाठी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचेही त्यांनी चपखल उदाहरण दिले. धावांचे विक्रम केल्यावर तो त्याचे श्रेय त्याच्या बॅटला देत असे…

सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा हा आनंदाचा व अविस्मरणीय क्षण आहे, या विमानातून उतरताना आपण भारावून गेलो होतो, असेही राणे यांनी बोलून दाखवले. पण विमानातून पर्यटक उतरल्यावर त्यांनी काय रस्त्यावरील खड्डे बघायचे का? या भेदक प्रश्नाने त्यांनी सरकारची पोलखोल करून टाकली. हायवे ते विमानतळ अॅप्रोच रोड (जोड रस्ता) झालेला नाही. शिवाय, वीज आणि पाणी यांचीही पुरेशी व्यवस्था झालेली नाही, याकडे लक्ष वेधले. पण त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून कोणतेही भाष्य केले नाही. या विमानतळासाठी काय केले, काय करणार हे सांगितले नाहीच. पण निधीची कमतरता पडू देणार नाही, एवढेही आश्वासन सरकारकडून या कार्यक्रमात दिले नाही. कोकणातील जनतेने वर्षानुवर्षे शिवसेनाप्रमुखांच्या शब्दावर विश्वास ठेऊन सेनेला भरघोस मतांनी लोकसभा व विधानसभेत निवडून दिले. जनतेला देताना सरकारचा हात आखडतो, हेच या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाले.

विमानतळ उभारणीत कोणाचा किती हिस्सा आहे, हे सांगण्यासाठीच शिवसेनेचे एवढे मंत्री आले असावेत, श्रेयवादाच्या लढाईत आपण कमी पडू नये म्हणून मंत्र्यांची फौज व्यासपीठावर ठेवली होती, असे वाटले. दीर्घकाळ रखडलेला विमानतळ शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळे झाला, असेही सांगण्यात आले. प्रत्यक्षात नारायण राणे हे केंद्रात मंत्री झाल्यावर त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन विमानतळाच्या राहिलेल्या उर्वरित परवानग्या मार्गी लावल्या व उद्घाटनाची तारीख निश्चित केली. मग पायगुण कोणाचा… राणे केंद्रीय मंत्री झाल्यावर तीन महिन्यांत विमानतळावरून उड्डाण सुरू झाले. मग महाविकास आघाडीचे सरकार गेले वीस महिने काय करत होते?

राणे यांनी आपल्या भाषणात, ठाकरे यांना, तुम्हाला चुकीची महिती दिली जाते, असा उल्लेख केला. पण ठाकरे यांनी त्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले असावे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री अशी त्यांच्यावर दोन्ही जबाबदारी आहे. पक्षातील नेत्यांना आणि सर्वसामान्यांना त्यांची सहज भेट मिळत नाहीच आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते व लोकप्रतिनिधी यांनाही त्यांची भेट व सुसंवाद सहज शक्य नाही. जे कोंडाळ्यात ठरावीक असतात, त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन निर्णय घेतले जात असतील अथवा कोणाविषयी मत बनवले जात असेल, तर धोकादायक ठरू शकते. राजकीय कुरघोडी आणि श्रेयवादाच्या वादात मुख्यमंत्री आले आणि कोकणाला काही न देता परत गेले. म्हणूनच चिपी विमानतळावर रोखठोक बोलणारे नारायण राणेच भारी ठरले.
sukritforyou@gmail.com