मिरकरवाडा येथे मासे घेण्यावरून वाद; महिलेला जखमी करणाऱ्या माय- लेकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी | प्रतिनिधी :

मिरकरवाडा जेटी येथे मासे घेण्याच्या वादातून महिलेच्या डोक्यात दगड मारुन तिला जखमी केल्याप्रकरणी माय-लेकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना सोमवार 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वा.घडली.

कासम सोलकर व त्याच्या आई (दोन्ही रा.मिरकरवाडा खडप मोहल्ला,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात नजमा इरफान मुकादम (50,रा.पांजरी मोहल्ला मिरकरवाडा,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानूसार,सोमवारी दुपारी त्या पती व मुलासोबत मिरकरवाडा जेटी येथे मासे खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या.त्यावेळी तेथील लाँच मालक डांगे यांच्याकडील म्हाकुळ मासा घेण्यासाठी वजन करत असताना कासम सोलकर आपल्या आई सोबत तिथे आला.

त्याने डांगे यांना मी तुम्हाला म्हाकुळेच जास्त पैसे देतो असे म्हणत वजन काट्यावरील म्हाकुळ घेउन गेला.यावरुन नजमा मुकादम आणि कासमची आई यांच्यात वाद सुरु झाला.तेव्हा कासम सोलकरने पुन्हा तिथे येउन नजमा मुकादम यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यात दगड मारुन तुला बघून घेतो अशी धमकी दिली.याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार राठोड करत आहेत.