मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक, जाहीर केली पुढील भूमिका

कोल्हापूर :  मराठा आरक्षणासाठी  खासदार संभाजीराजे पुन्हा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने सारथी सोडलं तर इतर दिलेलं आश्वासन न पाळल्याने संभाजीराजे पुन्हा राज्यभर दौरा करणार आहेत. रायगडपासून 25 ऑक्टोबरला दौऱ्याची सुरूवात होणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर काहीही केलेले नाही, असा थेट हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. सारथी सोडले तर इतर मुद्द्यावर दिलेले आश्वासन राज्य सरकारने पाळलेले नाही. त्यामुळे हा दौरा काढला जाणार आहे. राज्य सरकार आपली जबाबदारी पाळत नाही. सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर त्यांनी आश्वासन पाळले नाहीत, असा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे.

संभाजीराजे यांचा टोला

आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही. आता आणखी काय चर्चा करायची आहे. मराठा आरक्षणासाठी जे करता येईल, ते आम्ही करणार आहोत. त्यासाठी कुणी टीका करत त्याकडे मी लक्ष देत नाही. टीकाकारांना विनंती आहे त्यांनी आपला वेळ समाजासाठी द्यावा, असा टोला संभाजीराजे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला. उद्यनराजे यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर संभाजीराजे यांनी नाव न घेता हा टोला लगावला.

दरम्यान, सातारा गादी आणि कोल्हापूरची गादीमध्ये कोणताही मतभेद नाही. उदयनराजे नेमकं काय म्हटले हे मला माहित नाही, असे सांगत बाजु सावरण्याचा प्रयत्न संभाजीराजे यांनी यावेळी केला. मराठा आरक्षणाची मशाल चुकीच्या व्यक्तीच्या हातात असल्याची टीका उदयनराजे यांनी केली होती.