जिल्हा बँकेच्या सहकार पॅनेलमधील भाजपच्या २ जागा मान्य नाहीत : निलेश राणे

Nilesh Rane

रत्नागिरी । प्रतिनिधी

पक्षामध्ये अनेकजण इच्छुक असताना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व पक्षीय सहकार पॅनेलमध्ये भाजपाला दिलेल्या केवळ २ जागा आम्हाला मान्य नाहीत अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे. हे कसं  ठरवलं गेलं हे तर समजलं पाहिजेच परंतु अनेकांना नाराज करून तयार केलेल्या या पॅनेलच्या विरोधात उद्या दुसरे पॅनल उभे राहिले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी बँक अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व पक्षीय सहकार पॅनेलची घोषणा केली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह भारतीय जनता पक्षाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. संचालक पदाच्या २१ जागांचे वाटप करताना त्यातील २ जागा भाजपाला देण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आणि बँक संचालक ऍड दीपक पटवर्धन उपस्थित होते.

मात्र २१ पैकी अवघ्या २ जागा भाजपाला देण्यात आल्याबद्दल भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाला देण्यात आलेल्या अवघ्या २ जागा आम्हाला मान्य नाहीत. हे वाटप कोणाला विचारून ठरवण्यात आले ते कळत नाही. मात्र भाजपमध्ये सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी अनेकजण इच्छुक असताना त्याचा विचार न करता अवघ्या २ जागांवरच समाधान का मानले गेले असा सवाल उपस्थित करतानाच हेच इच्छुक एकत्र येऊन उद्या सहकार पॅनेलच्या विरोधात उभे राहिले तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही असा सूचक इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.