सिंधुदुर्गचे माणिकमोती..! सावंतवाडीच्या स्त्री नाटककार-हिराबाई पेडणेकर

डाॕ. बाळकृष्ण लळीत

जानेवारी २००९…. असाच एक दिवस…!
सकाळची वेळ होती.एवढयात सांगली येथून मला फोन आला.
‘ नमस्कार ..! आपण डाॕ.लळीत का ?’
‘हो ..! बोला !’
“आपण ‘आरती’मासिकात जो लेख लिहिला आहे, त्या नाटककार हिराबाईना मी माझ्या लहानपणी पाहिले आहे.तेव्हा मी दहाबारा वर्षांची होते. त्यांचे निधन पालशेत येथे झाले. आम्ही त्याच वाड्यात रहात होतो. नेने यांच्या वाड्यातील ते खानदानी स्रीचे तैलचित्रही मी पाहिलं आहे..!”
“आपण पाहिलेल्या फोटोतील ती खानदानी स्त्री या मराठीतील ज्येष्ठ नाटककार हिराबाई पेडणेकर होत्या हे मला
६० वर्षानंतर काल समजले..तेही आपल्या लेखामुळे…! मी
मनापासून आपले आभार
मानते!”
मी थक्क होऊन संभाषण ऐकत होतो. आरती मासिकाच्या त्या नियमित वाचक होत्या.नाव नक्की आठवत नाही बहुधा श्रीमती रश्मी निगुडकर असाव्यात…!

हे संभाषण झाल्यावर ..
…’टायटॕनिक’ या जगप्रसिद्ध चित्रपटातील ‘आजी’च्या रूपातील नायिका रोझ डिविट-बुकाटर माझ्या डोळ्यांसमोर क्षणभर तरळली.
हिराबाईंचे जीवन तसेच होते..!
++
“खरं तर हिराबाई पेडणेकर सा-या महाराष्ट्राच्या आहेत. मराठी रंगभूमीच्या आहेत.त्याचं मूळ गांव गोमंतकातील पेडणे असलं तरी त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८८५ या दिवशीचा आपल्या सावंतवाडीचा !
म्हणूनच प्रत्येक सावंतवाडीकरांला, मालवणी माणसांना त्यांच्याविषयी अभिमान वाटायला हवा !” कारण…..?
“त्यांचे मूळ गांव पेडणे. गोमंतकीय माणूस ‘गोमन्त सौदामिनी’ मध्ये ‘धगधगता गुलमोहर’ म्हणून त्यांना मानाचा मुजरा करतो.”
“विदर्भातील नाटककार’ या परिचय कोशात रंगीत छायाचित्रासह त्यांच्या नाट्य कर्तृत्वाला वंदन केले जाते. -कारण नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी त्यांना पडत्या काळात खामगांव (बुलढाणा) येथे नेले. त्यांची रहाण्याची व्यवस्था केली.”
१८ऑक्टोबर १९५१ रोजी या महान सिंधुकन्येचे पालशेत येते कर्करोगाने त्यांचे निधन झाले.
काशीबाई फडके (१८७३-१८९६) सोनाबाई चिमाजी केंरकरीण (१८८०-१८९५) या स्त्री नाटककारांनंतर १९०४ साली संगीत जयद्रथ विडंबन’ हे नाटक लिहिणाऱ्या हिराबाई पेडणेकर या मराठीतील तिसऱ्या स्त्री नाटककार होत.
आम्हा सिंधुदुर्गवासियांना याचा अभिमान वाटणे स्वाभाविकच आहे.
++
नाटककार हिराबाईनी कविता लिहिल्या.त्या तत्कालीन ‘मनोरंजन’, ‘उद्यान’ या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. ‘माझे आत्मचरित्र ‘नावाची कथा त्यांनी लिहिली होती.
मराठी-संस्कृतचा अभ्यास केलेल्या हिराबाई संगीतकार होत्या. थोर प्रतिभावंतांचा सहवास त्यांना लाभला होता. बालकवींनी त्यांच्यावर ‘चाफेकळी’ नावाची कविता लिहिली होती. हिराबाई आणि
कृष्णाजी नारायण नेने यांच्या भावपूर्ण जीवनावरून प्रेरणा घेऊन प्रख्यात नाटककार वसंत कानेटकर यांनी ‘कस्तुरीमृग’ नाटक लिहिले आहे..
वाचकहो…!
हे सारे ठीक. पण..? आज वास्तव काय.. ?
त्यांच्या जन्मभूमीत ‘नाही चिरा.. नाही पणती’….!
++
हिराबाई पेडणेकर – लौकिक जीवन-
त्यावेळच्या सावंतवाडी संस्थानात सावंतवाडी शहरात २२ नोव्हेंबर १८८५ रोजी त्यांचा जन्म झाला. त्या लहान असतानाच आईचे निधन झाल्यामुळे त्यांची मावशी लहान हिराला घेऊन वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी
मुंबईला आली ; म्हणजे ते साल १८९२ – ९३ दरम्यानचे असावे. मुंबईत आल्यावर नवीवाडी मधील ‘मिशनरी स्कूल’ मध्ये त्यांचे शिक्षण सुरु झाले. मुळातच अत्यंत हुशार, कुशाग्र बुद्धिमत्ता असणारी हिरा अभ्यासातील सर्व विषयात पारंगत झाली. मावशीकडे घरात ‘संगीत’ होतेच. नव्हे तो ‘घराण्याचा वारसा’ असल्याने मावशीने त्यांच्या संगीत शिक्षणा’ची व्यवस्था केली.
भास्करबुवा बखले, परशुरामपंत धुळेकर, फैय्याज खाँ इत्यादी श्रेष्ठ संगीतकारांनी त्यांना तालीम दिली. एवढेच नव्हे अंजनीबाई मालपेकर या मैत्रिणीचे गुरु नजिरखाँ,खादिम हुसेन खाँ यांचे गाणेही हिराबाईने आत्मसात केले. लहान वयातच नृत्य व उत्कृष्ट गायिका म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. विशेष महत्त्वाचे म्हणजे इंग्रजी, • मराठी बरोबरच पंडित गुर्जरशास्त्री यांच्या पाठशाळेत जाऊन त्यांनी संस्कृतनाट्य व वाङ्मय यांचे अध्ययन केले. एकदा प्रख्यात संगीत नाटककार गोविंद बल्लाळ देवल हिराबाईच्या घरी आले. देवलांच्या नाट्यकलेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्यांनी सुरुवातीला कविता लिहिल्या व त्याकाळच्या ‘मनोरंजन’ या मासिकातून त्या प्रसिद्धही झाल्या.
मूळचे गोमंतकीय रूपसंपन्न व्यक्तिमत्त्व ! सावंतवाडीच्या लालमातीची वाट्टेल ते कष्ट करण्याची चिकाटी, सौंदर्यसृष्टी आणि वागण्या – बोलण्यातील खानदानी संस्कार शिवाय अभिजात संगीताचा वारसा डी. यामुळे हिराबाई पेडणेकर यांना तरुण वयातच प्रसिद्धीचे वलय मिळाले जे अन्य कुणाला क्वचितच लाभते.
या सर्वांमागे सावंतवाडीसारख्या गावातून त्यांना मुंबईला आणणाऱ्या मावशींचा निर्णय फार महत्त्वाचा आहे.
अन्यथा हिराबाईना पुढ संगगीत आणि नाट्यलेखन क्षेत्रात एवढे कार्य करता आले नसते.
हिराबाईच्या लौकिक जीवनाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांचे रूपसंपन्न,सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व ! त्यांच्या कविता खुद्द राम गणेश गडकरी,कवी गुर्जर,बालकवी, लेले,मामासाहेब वरेरकर यांनी ऐकल्या.कवी रेंदाळकरांनी त्यांच्या कवितांची स्तुती केली. नंतर त्या नाट्यलेखनाकडे वळल्या.
मुंबईनंतर खामगाव (बुलढाणा) व पुढे पालशेत ( गुहागर) कृष्णाजी नारायण नेने यांच्या घरी त्या रहात. तेथेच १८ऑक्टोबर १९५१ रोजी त्यांचे निधन झाले.
(हिराबाई पेडणेकर यांचा जन्म सावंतवाडी येथे २२ नोव्हेंबर १८८५ रोजी झाला. बालपणीच मातृसुखाला पारख्या झालेल्या हिराबाई आपल्या भावासहित मावशीबरोबर मुंबईला आल्या. त्यांचे सुरवातीचे शिक्षण सावंतवाडीलाच झाले. पुढे संगीत , शिक्षण मुंबईला झाले.
वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी संगीत जयद्रथ विडंबन’ हे संगीत नाटक लिहिले. पहिल्या तीन मराठी स्त्री नाटककारात हिराबाई पेडणेकर यांचा तिसरा क्रमांक लागतो.-‘विदर्भातील नाटककार’ (रीशा बुक्स इंटरनॅशनल,मुंबई पृ.१८८)
++
संगीतकार हिराबाई पेडणेकर-
बाबूराव जोशी यांच्या ‘संगीताने गाजलेली रंगभूमी’ (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे १९७४) या ग्रंथात त्यांनी ‘संगीतकार’ म्हणून केलेल्या कार्यावर प्रकाश पडतो.
‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी ‘मतिविकार’ (१९०७), प्रेमशोधन (१९१०) या नाटकातील चालीत बदल केला. गाणी लोकप्रिय व्हावीत हा त्यामागे हेतू होता. याकरिता त्यांनी सुप्रसिद्ध गायिका हिराबाई पेडणेकर व त्यावेळचे नट यांची मदत घेतली. यामुळे या नाटकातील चाली पुष्कळच बऱ्या झाल्या’
बाबूराव जोशी म्हणतात,’श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या विषयी लिहीत असताना त्यांच्या सान्निध्यात आलेल्या • अल्पशिक्षित पण सुसंस्कृत अशा गायिका हिराबाई पेडणेकर
यांचा उल्लेख पहिली स्त्री नाटककार म्हणून कौतुकाने करावासा वाटतो. (नंतर हा संदर्भ बदलला) त्यांचे ‘संगीत जयद्रथ विडंबन’ (१९०४) हे भरपूर पदे असलेले पहिले नाटक त्यांचे ‘संगीत दामिनी’ (१९१२) हे दुसरे नाटक केशवराव भोसले यांनी रंगभूमीवर आणले. कोल्हटकरांच्या मतिविकार व प्रेमशोधन नाटकातील पदांना त्यांनी चाली लावल्या. आणखीही काही तत्कालीन नाटककारांनी. हिराबाईकडून चाली घेतल्या. त्यांच्या अंगी असे बहुविध गुण असतानाही आणि त्यांना दीर्घायुष्य (१८८५ ते १९५१) प्राप्त झाले असतानाही त्या एकंदरीत उपेक्षित अशा रहाव्यात हे दुर्दैव होय.’ (पृ. ३३)
आणखी माहिती म्हणजे ‘प्रेमशोधन’ हे संगीत नाटक १९१० साली रंगभूमीवर आले. त्यातील आठ पदांना चाली तर राम गणेश गडकरी यांच्या ‘पुण्यप्रभाव’ या ७ जून १९१६ रोजी रंगभूमीवर आलेला व पुढे प्रचंड गाजलेल्या नाटकातील दहा पदांना हिराबाई पेडणेकर यांनी चाली लावल्या.
या त्यांच्या संगीतकार म्हणून कार्याची नोंद डॉ. वि. भा. देशपांडे यांनी मराठी नाट्य कोशात’ (डिसें. २०००) पृ. २७९ वर केली आहे.
हिराबाईंनी संगीत दिलेल्या या नाटकातून किर्लोस्कर कंपनीच्या नटांनी नाटयगीतांची बहार उडवून दिली.
++
उपेक्षित जगणे !-
हिराबाई पेडणेकर यांची त्या काळात व नंतरही उपेक्षा झाली अशी खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. मात्र :मला ते मत तेवढेसे पटत नाही,कारण त्याकाळचे ‘केसरी’चे संपादक साहित्य सम्राट तात्यासाहेब केळकर यांनीही त्यांच्यावर गौरवपर एक कविता लिहून त्यांचे कौतुक केले होते. ( पहा-‘संदर्भ गोमंत सौदामिनी’, सं.माधवी देसाई, पृ.८)
१९९६ साली पद्मगंधा प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या ‘भारतीय रंगभूमीच्या शोधात’ या ग्रंथात हिराबाई पेडणेकर यांच्याविषयी अभिमान व्यक्त केला आहे.त्यांतील सारांश असा –
“गंधर्व युगाच्या अखेरीस १९३० नंतर ‘स्त्री भूमिका स्त्रियांनीच कराव्यात’ हा सुधारणावादी विचार बदलत्या भौतिक परिस्थितीमुळे अंमलात आला…..आपल्या असाधारण अनेकांगी कर्तृत्वाच्या बळावर समाजात अभिमानास्पद वाटेल असे विलक्षण कर्तृत्व प्रकट केले त्या ‘गोमंतक मराठा समाजा’तूनच प्राधान्याने या पुढच्या काळात रंगभूमीवर स्त्रियांचा प्रवेश झाला. आद्य स्त्री नाटककारांमध्ये ज्यांचे नाव घेतले जाते, त्या आरंभकाळातील सुसंस्कृत हिराबाई पेडणेकरांपासून पुढे नाटक – चित्रपटातील अनेक अभिनेत्रींची आणि गाजलेल्या गायिकांनी अभिमानास्पद कामगिरी केली.या सर्वांचा लाभ नव्या मराठी रंगभूमीला घडू शकला.” (पहा या ग्रंथातील २०३, २०४ क्रमांकाची पाने)
२००२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री साहित्याचा मागोवा’ खंड १ या ग्रंथात डॉ. तारा भवाळकर यांनीही हिराबाईच्या नाट्यविषयक कर्तृत्वाचा गौरव केला आहे. “ही एका अशिक्षित स्त्रीची (तशी) सामान्य कृती
आहे. मात्र स्त्री शिक्षणाविषयी कौतुक असलेल्या अनेक द्वान व रसिकांना ती आवडली.विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात हिराबाई पेडणेकर यांनी नाटक लिहून ‘स्त्रियांना नाट्यलेखन असाध्य नाही हे सिद्ध केले.
त्यांच्या नाट्यलेखनाविषयी पुढे म्हटले आहे की, ‘संगीत दामिनी’ चे कथानक काल्पनिक आहे. दामिनी आणि तिचा पती यांची वादळात ताटातूट होणे, परस्परांच्या शोधासाठी त्यांनी वेषांतर करणे, कारस्थान्यांचे अडथळे, त्यांची उकल, अखेर सुखान्त बुवाबाजीला बळी पडणाऱ्या स्त्रिची स्थिती, त्यांना शिक्षण मिळायला हवे असे सांगण्याचा प्रयत्न त्या नाटकातून करतात. हे विशेष होय.
त्या काळातील परिभाषेत हिराबाई पेडणेकर ‘कुलीन’ स्त्री नसून ‘कलावती’ संप्रदायातील स्त्री असल्याने तिची जेवढी दखल घेतली जाणे आवश्यक होते, तेवढी घेतली नाही.’ असे उद्गार डॉ. तारा भवाळकर यांनी काढले आहेत. (पृ. १८४)
प्रख्यात मराठी अभिनेते नटवर्य गणपतराव बोडस यांच्या ‘माझी भूमिका’ या आत्मचरित्रात नानासाहेब जोगळेकर या किर्लोस्कर कंपनीतील गाजलेल्या नटानी हिराबाई पेडणेकर यांचे ‘संगीत दामिनी’ हे नाटक किर्लोस्कर कंपनीने करावे असा आग्रह धरला. शंकरराव मुजुमदार हे तिचे सेक्रेटरी होते. जोगळेकरांसारख्या नटाला नाखुश करू नये म्हणून ‘हरकत नाही, पहा प्रयोग करून! ‘ असे उद्-गार शंकररावांनी काढले. पण ते नाटक काही किर्लोस्कर
कंपनीने रंगमंचावर आणले नाही.अशी आठवण शब्दबद्ध केली आहे. जोगळेकरांच्या आग्रहापेक्षा स्त्री नाटककारांना प्रोत्साहन म्हणून हे नाटक किर्लोस्कर नाटक मंडळीने रंगमंचावर आणायला हवे होते ते नाटक कंपनींना शोभणारे नव्हते. असे जरी गणपतराव बोडसांसारख्या कसलेल्या
नटाला वाटत असले, तरी तेव्हा जर हे नाटक रंगमंचावर आले असते तर हिराबाईंनी पुढे त्यापेक्षा दर्जेदार नाट्यलेखन केलेही असते असे माझ्यासारख्याला आजही वाटते. अर्थात दरम्यान हिराबाईंनी ‘मीराबाई’ हे संगीत नाटक लिहिले. मात्र त्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.या नाट्यसंहितेचा शोध घ्यायला हवा.
आजघडीला हिराबाईंच्या दोन नाटकांच्या संहिता उपलब्ध आहेत. या दोन्ही नाट्यकृतींचा थोडक्यात परिचय करून घेऊया.
++
संगीत जयद्रथ विडंबन’-
१९०४ साली हिराबाई पेडणेकर यांचे हे नाटक ‘ललितकलादर्श’ संगीत नाटक मंडळीने रंगभूमीवर आणले.आपले हे नाटक या संगीत नाटक मंडळीने रंगमंचावर आणले व ठिकठिकाणी प्रयोग केले याबद्दल हिराबाई आभार व्यक्त करतात. पण हे आभार व्यक्त करताना– ‘स्रीशिक्षणाविषयीच्या’
आस्थेबद्दल कंपनीचे विशेष आभार व्यक्त करायला त्या विसरत नाहीत. या आस्थेतून त्यांच्या नाट्यलेखनामागचा हेतू स्पष्ट होतो.
‘नाट्यकथानक ‘पांडवप्रताप’ या ग्रंथातून त्यांनी या नाटकाचे कथानक निवडले आहे. आपल्या पतींसोबत द्रौपदी वनात धौम्य ऋषींच्या आश्रमात रहात असताना तिचे पती शिकारीसाठी अरण्यात गेले.राजा जयद्रथ व त्याचा मित्र कोटिक हे त्या अरण्यातून जात असताना त्यांची नजर द्रौपदीवर पडते. या अरण्यात एवढी सुंदर स्त्री कोण? याविषयी जयद्रथाला काहीच माहित नसते. तो तिच्या मोहात पडतो व मित्राला तिच्याकडे पाठवतो.पुढे कोटिक सर्व माहिती काढतो पण ‘पांडवांची पत्नी आहे हे ज्ञात झाल्यावरही जयद्रथ द्रौपदीजवळ येतो.द्रौपदीच्या दासीला कोणतीच काळजी वाटत नाही कारण एक तर धौम्यऋषी आश्रमात आहेत व प्रत्यक्ष ईश्वर तिचा पाठीराखा आहे. पण जयद्रथ धाडसाने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करतो. दासी अरण्यात जाऊन ही घटना पांडवांना कथन करते.पांडवांची भेट झाल्यावर जयद्रथ घाबरतो. त्याचा मित्रही सैन्यासह पलायन करतो. धर्मराज त्याला अभय देतो; मात्र या विटंबनेपेक्षा आपल्याला मरण आले असते तर बरे असे जयद्रथाला नंतर वाटते.
असे कथानक हिराबाईंनी आपल्या नाटकासाठी निवडले आहे. नाटक ‘संगीत’ असल्याने अनेक पदे, सुरवात व शेवट त्यावेळेच्या नाट्यलेखन प्रथेनुसार ईशस्तुतीने त्यांनी केली आहे.
या नाटकातून पात्रांच्या मुखातून नाट्यलेखिका हिराबाई स्त्रियांना पतिव्रतेचा धर्म काय असतो ? ते नाट्यगीतांतून सांगतात-

‘मानित जगी जी पतीवाचुनी दैवत अन्य नसे । चिंतन करुनि अनुदिनी दिवसा कंठितसे । वदन पतीचे क्षण न दिसे तर अति दुःख होते । जननीजनकापरि जी मानी सासू श्वशुराते । तीच सती या युवतीमाजी एकटि धन्या ‘
त्याकाळी नाट्यगीतांतून ‘सासू सासऱ्यांना आई वडिलांप्रमाणे मानावे’ असा उपदेश करणाऱ्या हिराबाई दूरदृष्टीच्या दिसतात. आजही हा संदेश देणे आवश्यक वाटते.
नाटकातील द्रौपदी म्हणते, ‘रुपसंपन्नता तरी स्त्रियांना घातकच आहे. द्रौपदीच्या मुखातील हे हिराबाईंचे उद्गार समस्त स्त्रियांनाही मान्य होतील अशी आजची सामाजिक स्थिती आहे.पांडव जयद्रथाला पकडतात तेंव्हा जयद्रथाला आपण अपराधी असल्याचे जाणवते येथे हिराबाईंनी संवादात म्हटले आहे, ‘द्रौपदीच्या रुपाला मोहित होऊन मी विवेकशून्य झालो आणि आपले कर्तव्य विसरलो !
जयद्रथाला अपराधाची जाणीव झाल्यावर धर्मराज शेवटी म्हणतात, हा राजा आहे, अनेकांचा प्रतिपाळ करणारा आहे. एखादे तरी पुण्यकृत्य करेल, म्हणून त्याला. सोडावा…..”
नाट्यलेखिका हिराबाई पेडणेकर यांनी वरील प्रसंगाने नाटकाचा शेवट केला आहे. ‘स्त्री ही पुरातन काळापासून सोशिक व दयाळू आहे हीच भावना नाटकाच्या शेवटी पुरुष “मुखातून का होईना व्यक्त करताना येथे दिसून येते.
‘स्त्रियांचे गद्यलेखन’ या ग्रंथात डॉ. मधुबाला खोपडे यांनी या नाटकाविषयी म्हटले आहे की, ‘हिराबाईंची या नाटकातील वर्णने
स्त्रीजीवनाचे चित्रण करतात
स्त्री शिक्षणाची गरज हिराबाईंना वाटते. १९१२ साली एका स्त्री नाटककारांना हे जे कारण महत्त्वाचे वाटले त्या काळाला आज १०० वर्षे होत आहेत.
या नाटकातील सर्व वर्णने स्त्रीभोवती गुरफटलेली आहेत….. अधर अमृताची मागणी करणारा जयद्रथ काव्यातून नायिकेला आलिंगन देण्याची भाषा करतो. नाटकात उघडपणे इतके शृंगारिक वर्णन लिहिणाऱ्या हिराबाईंचा धीटपणा एखाद्या पुरुषलेखकाला शोभेल असा आहे. ‘
उपमा, अलंकारांचा वापरही त्या करतात. हिराबाईची ही पहिली नाट्यकृती ‘यशस्वी’च म्हटली पाहिजे कारण ज्या काळात हे नाटक रंगभूमीवर आले (१९०४) तो काळ संगीत रंगभूमीवरील अभिजात नाटककार व नटमंडळींचा सुवर्णकाळ होता. हिराबाई पेडणेकरांनी स्त्री नाटककारांना सुंदर धाडसी ‘ओपनिंग’ करून दिली होती…. पण……
संगीत दामिनी-
हिराबाईंनी स्त्री नाटककारांना सुंदर धाडसी ‘ओपनिंग’ करून दिली खरी पण संगीत जयद्रथविडंबन’ चे फारसे प्रयोग झाले नाहीत. त्यानंतर जवळपास सात आठ वर्षानंतर म्हणजे १९१२ साली त्यांचे दुसरे नाटक मराठी रंगभूमीवर आले आणि ते म्हणजे ‘संगीत दामिनी’
या नाटकाच्या कथानकासंदर्भात डॉ. तारा भवाळकर या काय म्हणतात हे या लेखात आपण वाचले आहेच पण संगीत ‘दामिनी’ बद्दल डॉ. मधुबाला खोपडे यांचा अभिप्रायही तेवढाच महत्त्वाचा आहे. ‘संगीत दामिनी’ हे चार अंकी नाटक असून या नाटकात सुरुवातीला वादळाची थोडीशी भयानकता असली तरी पुढे स्त्रीचा (सवती) मत्सरी स्वभाव, साधुबुवांच्या ढोंगाला बळी पडलेल्या स्त्रिया, बालविवाहाचे दुष्परिणाम, त्याबद्दल जागरुक झालेले तरुण आणि स्त्रीशिक्षण असे अनेक विषय त्यांनी या एकाच नाटकातून हाताळले आहेत.
”स्त्रियांचा मत्सरी स्वभाव त्यांच्या आयुष्यातील सुखच नाहीसे करतो हा मुद्दा हिराबाई येथे मांडतात. स्वतःला मूल नाही म्हणून तारिणी पुरंदर ना साधूकडे जाते तेंव्हा तो तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो. वरील उदाहरणातून हिराबाई काही निष्कर्ष काढतात. त्यापैकी महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे अज्ञानामुळे स्त्रियांच्या वाटयाला दुःख येते. स्त्रियाच ढोंगी साधू लोकांचे स्तोम माजवितात व स्त्रियांच्या अज्ञानामुळेच अशा लोकांच्या जाळ्यात अडकतात. त्यांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी स्त्रीशिक्षणाची गरज वाटते.या पार्श्वभूमीवर आजही स्त्रियांच्या संदर्भातील काही घटनांकडे हिराबाईंच्या विचारातून पहावे लागेल.
मंदार इंदुमती, दामिनी – रजनिकांत, तारानाथ • तारिणी यांचे नाटकांच्या शेवटी मिलन होते. रजनीकांत आपल्या बहिणींना स्वतःची ओळख सांगतो व नाटकाचा गोड शेवट होतो. हे जरी खरे असले तरी नाटकातून पुरुषांचा स्त्रियांकडे पहाण्याचा दृष्टिकोन त्या व्यक्त करतात..चालविवाह पद्धतीचा निषेध व्यक्त करतात. स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन ‘ज्ञानमार्गी’ व्हावे असे लेखिकेला वाटते. हे सारे विचार तत्कालीन समाजसुधारणावादी विचारमालिकांशी संवादी आहेत. याचा अर्थ.आजुबाजूला ही सामाजिक सुधारणावादी, शैक्षणिक स्थित्यंतरे होत होती या बद्दल हिराबाई सतर्क होत्या. म्हणूनच मला असे आवर्जू चाटते की, त्यांनी जरी दोन किंवा तीन नाट्यकृती लिहित्या असल्या तरी ‘नाटककार’म्हणून त्या मराठीतील
यशस्वी नाटककारच ठरतात.
++
हिराबाईंच्या नाट्यलेखनाची थोरवी-
आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासात हिराबाई -पेडणेकर व त्यांच्या समकालीन नाट्यलेखिका सोनाबाई केरकरीण, गिरिजाबाई केळकर यांचा उल्लेख लेखन समीक्षेसह व्हायला हवे.
नाटक हा वाङ्मय प्रकार सुरुवातीच्या काळात स्त्रियांनी कमी प्रमाणात हाताळला. काशीबाई फडके यांचे ‘सीताशुद्धी’ हे नाटक त्यांच्या मृत्यूनंतर एका वर्षांनी म्हणजे १८८८मध्ये प्रसिद्ध झाले. हिराबाई पेडणेकर यांच्या नाटकांच्या अभ्यासिका डॉ. मधुबाला खोपडे यांनी म्हटले आहे की, ‘कोणत्याही वाईट गोष्टीला बळी न पडता कठीण परिस्थितीमध्ये स्त्रियांनी आपला पतिव्रता धर्म पाळावा. असे हिराबाईंना वाटते. “स्त्री-पुरुष हा भेद ज्ञानमार्गावर कृत्रिम आहे. असा महत्त्वाच विचार विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात मांडला ‘ही घटना लक्षणीय आहे. स्त्री सुधारणा झाल्या पाहिजेत असे हणणाऱ्या हिराबाई पारंपरिक रुढीबंधनांना तितकेच महत्त्व देतात. पुरुषांचे हक्क स्त्रियांनी मानलेच पाहिजेत असे
हिराबाईंना वाटत होते. पुरुष लेखकाने करावे असे शृंगाराचे ‘वर्णन त्या धीटपणे करतात यातूनच त्यांच्या लेखनातील ‘मोकळेपणा जाणवतो’ (स्त्रियांचे गद्यलेखन; स्नेहवर्धन. प्रकाशन, पुणे, २००५,पृ.१५१)
‘हिराबाईंच्या नाट्यकर्तृत्वाची थोरवी म. ल. वराडपांडे या नाट्य अभ्यासकानी ‘कोल्हटकर आणि हिराबाई’ या १९६९ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांतून व्यक्त केली. (साहित्य सहकार प्रकाशन, मुंबई) डॉ. सुधा पेशकार यांनी दै. लोकमत मध्ये हिराबाईंच्या नाट्यकर्तृत्वावर दीर्घ लेख प्रसिद्ध केला होता.
++
हिराबाईंचे स्मरण : आवश्यक
हा लेख मी ‘आरती’ च्या वाचकांसाठी खास लिहिला होतापण१/२वाचक सोडता याची साधी दखल कोणी घेतली नाही.त्याचे कारणही तसेच आहे. गेली सुमारे २७ वर्षे ‘आरती’ हे वाङ्मयीन मासिक सावंतवाडीहून •प्रकाशित होत आहे.हिराबाई पेडणेकर यांचा जन्म याच सावंतवाडी शहरात१८८५ साली झाला.पण त्यांचे स्मरण वा स्मारक निदान माझ्या तरी पहाण्यात नाही. ते व्हावे म्हणून मध्यंतरी मी प्रयत्न केले. या परिसरातील रंगकर्मींशी बोललो. एका पत्रकार मित्राला हिराबाईंचे कर्तृत्व व जन्मस्थळांविषयी सविस्तर पत्र पाठवून कळविले. त्या पत्राला साधी पोच देण्याचे सौजन्यही दाखविले गेले नाही. याचा अर्थ असा नव्हे की, हिराबाईंविषयी कुणाला आत्मियता नाही, त्यांच्याविषयीचा आदरभाव सर्वांना आहे.फक्त तो कोणत्या कोणत्यातरी स्वरुपात व्यक्त झाला पाहिजे.
सावंतवाडी येथे नगरपालिकेने त्यांचे नाव रस्त्याला,एखाद्या वास्तूला द्यायला हवे.त्यांची छायाचित्रे शाळा,महाविद्यालये, ग्रंथालये येथे ठळकपणे दिसतील अशी लावली पाहिजेत.असे मी नगराध्यक्ष श्री. संजय परब यांना गदिमा स्मृती कार्यक्रमात मोती तलावापाशी सांगितले.पाहू पुढे काय होते. त्यांच्या स्मृतींना आदरांजली म्हणून नावाने पुरस्कार दिला पाहिजे.मात्र –
सद्या तरी जन्मभूमीत नाही चिरा नाही पणती..!
त्यांच्या नांवे स्पर्धा,पारितोषिक, स्मरणदिन साजरा करता येईल. हिराबाईंच्या सावंतवाडी येथील घराचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण मला यश मिळाले नाही.त्यामागे मला तेवढा वेळ मिळाला नाही,पण कुणीतरी स्थानिक नाट्यरसिक,चाहत्याने त्यांच्या जन्मस्थानाचा शोध घ्यायला हवा असे मला वाटते. हा लेख वाचल्यावर त्यांच्या स्मृतींना चालना मिळावी अशी नम्र अपेक्षा व्यक्त करतो.असे हे आपले लालमातीत सुंदरवाडीत जन्मलेले माणिक.. मोती..नाव मात्र ‘हिरा’..! हिराबाई पेडणेकर..!
——- हे सारे कार्यकर्तृत्व लिहितानाच…शिल्पा सुर्वे यांचे डिम्पल प्रकाशनने प्रकाशित केलेला ‘आद्य मराठी नाटककार हिराबाई पेडणेकर’ हा संशोधनात्मक ग्रंथ हाती आला. आणि मलपृष्ठावरील मजकूर वाचताना मन भरून आलं..
त्यावर लिहिले आहे…
“या सांस्कृतिक घडामोडीत आद्य महिला नाटककर्ती हिराबाई पेडणेकर कुठे गेली? कुणा नेने नावाच्या भल्या माणसाच्या आश्रयाने गुहागर येथील पालशेत गावी राहायला गेली आहे. एवढीच माहिती तिचे समकालीन सांगायचे. तिचे पुढे काय झाले हे कुणालाही ठाऊक नव्हते. हिरानेही कधी कुणाशी पत्रव्यवहार ठेवला नाही. ना मैत्रिणींशी, ना नाट्य वर्तुळातील मंडळींशी. काळ पुढे सरकत होता. कधी संगीत नाटक परंपरेवर वर्तमानपत्रात काही छापून आले तर त्यात हिराचे आणि ‘संगीत दामिनी’चे नाव यायचे. कधी कुणीतरी लेखात कोल्हटकर संबंधाने तिचा उल्लेख करायचे. मात्र यातील खरा खोटा तपशील तपासायला हिरा होतीच कुठे? ज्या हाताने नाटक लिहिले, ज्या बोटांनी तानपुऱ्याच्या तारा झंकारल्या, तो सारा भूतकाळ झाला. मग हिराचे वर्तमान काय होते? सकाळी लवकर उठून सडा-सारवण, वाडी शिंपणाकडे लक्ष, दुपारी झाडावरून उतरवलेल्या नारळ आणि सुपारींची मोजदाद,कधी पापड, सांडगीचे, वाळवण तर गडी माणसे हाताशी धरून घराची डागडुजी! तिच्या संगीतमय आयुष्याची भैरवी कधीच सादर झाली होती.”
….सांगली येथील माझ्या लेखाच्या वाचक रश्मीताई निगुडकर यांनी त्यांना आपल्या बालपणी प्रत्यक्ष पाहिलं होतं..! भाग्यवान होत्या रश्मीताई..!
—————————————
संदर्भ -आवश्यक संदर्भ लेखात नोंदविले आहेत.

(9665996260)