सिंधुदुर्गचे माणिकमोती…!.. कोनशी (सावंतवाडी)चे दशावतारी कलावंत कै. बाबा कोनसकर

प्रा.डाॕ.बाळकृष्ण लळीत
—————————————
कोनशी (सावंतवाडी)चे
महान दशावतारी कलावंत
कै. बाबा कोनसकर

ज्येष्ठ दशावतारी कलावंत व
अभ्यासक मा.राजाभाऊ
आजगावकर यांनी बाबा
कोनसकर यांच्याविषयी एक संस्मरणीय आठवण सांगितली होती. ती अशी-
“बाबा कोनसकर मल्लासूराची भूमिका फारच छान करत असत..एके दिवशी सहज मी त्यांना म्हणालो, ‘बाबा’ या भूमिकेला लोक तुम्हांला दररोज बक्षिसे देतात. आज तुमची मी गंमत करतो. तुमच्या प्रवेशात तुमच्या गांवाचाच उल्लेख करतो. या माझ्या बोलण्यावर हसत-हसत बोलताना बोलणे वाढले व त्याचे रूपांतर पैजेत झाले. बाबांची आणि माझी पैज लागली.कोणत्यातरी गावी नाट्यप्रयोग होता.आमचा शेवटचा प्रवेश आला.सर्व देवांना पराभूत करून मणिमल्लासूर (बाबा) ब्रम्हदेवावर (माझ्यावर) चाल करून येतो. नित्याप्रमाणे दररोजचे संभाषण झाल्यावर मधेच ब्रह्मदेव(मी) बोलावयाला सुरूवात केली.
“उन्मत्त मल्लासूरा..माझ्या वरदानाने उन्मत्त होऊन आज साऱ्या तेहतीस कोटी देवांना तू पराभूत केले आहेत. कोनशीच्या अरण्यात थैमान घालून तिथल्या अरण्याची नासधूस करून ऋषीमुनींचे आश्रम नष्ट करून टाकलेस…! पण एक लक्षात ठेव, माझ्या इच्छेने निर्माण झालेला तू या पृथ्वीतलावरील एक किडा! त्याला मी वरदानाने पंख दिले. त्याचा सुंदर पक्षी बनविला तो पक्षी आपल्या पंखाच्या झंझावाताने देवतांचा शांती नंदादीप तुझ्या पंखाच्या झंझावाताने विझला जाणार नाहीच; पण त्याला विझवू पहाणारे पंख त्या दिव्य ज्योतीने जळून जातील आणि शेवटी तू राहशील तो एक किडा’.
हा आमचा प्रवेश त्याकाळी खूपच गाजला होता नाटक संपल्यानंतर बाबाने माझे अक्षरशः पाय धरले व मला सांगितले,’ भाऊ, मी हरलो.!’ त्याला मी माझ्या कवेत घेतले. त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला आशीर्वाद दिला.
आज माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा रहातो आणि माझे डोळे पाणावतात.असे हे बाबा काळाच्या काळ्या पडद्याखाली झाकले गेले.”
++
वाचकहो…!
तुम्ही कधी बांदा या गावी गेला असाल तर बसस्थानकानंतर दोडामार्गकडे जाताना लगेचच डावीकडे एक रस्ता वाफोलीकडे जातो.तेथून पुढे निघाले की, वाफोली,विलवडे,भालावल या गावानंतर कोनशी हे गाव लागते तेथे गावठण वाडीत कुणालाही विचारा बाबा किंवा दादा कोनासकर यांचे घर.. ! बाबाना जावून आता जवळपास ३०-३२वर्षे झाली पण गावकरी त्यांना विसरले नाहीत. त्यांची दादा आणि उदय हे दोन्ही मुले की जे आपल्या वडिलांची दशावतार कला आजही सांभाळून आहेत ..आणि आठवणीही…!
खरे तर लोक कोनशी असे म्हणत असले तरी या गावाचे मुळनाव ‘कोनास’.देवी माऊली ही येथील ग्रामदेवता.या गावी पूर्वी कधीतरी पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळून गोमतंकातून राणे घराणे कोनासला आले व स्थायिक झाले.शेती बागायती करू लागले.याच गावी सुप्रसिद्ध दशावतार कलावंत बाबा (राणे) कोनासकर यांचा जन्म १९४०साली झाला.
++
मी जेव्हा त्यांचे चिरंजीव दादाशी संपर्क केला,तेव्हा बोलताना ते काहिसे भावनाविवश झाले कारण बाबांवर मी लेख लिहिणार याचा त्यांना खूप आनंद झाला होता.
ते म्हणाले,
“माझ्या बाबांच्या वडिलांचे म्हणजे माझ्या आजोबांचे नाव बाबुराव राणे. ते पण नाटकात काम करायचे,तसेच माझं, काका दाजी राणे…हे पण दशावतारी कलावंत होते. आम्ही पाच भावंड घरात गरीबी पण आम्हाला शिकवण्यासाठी बाबांना खूप कष्ट -मेहनत करावी लागली, दुर्दैवाने त्यांच्या वयाच्या ५२व्या वर्षी त्यांचे मामा मोचेमाडकर कंपनीत असताना निधन झालं, त्या वेळी घरात कुणीही कमावती व्यक्ती नव्हती, पण त्यांच्या पुण्याईने वयाच्या १८-२०व्या वर्षी मी दशावतारात प्रवेश केला आणि मला दशावतारात चांगला रसिकांचा प्रतिसाद मिळाला, मग माझा भाऊ उदय याने पण दशावतारात प्रवेश करून तोही यशस्वी झाला, माझे दोन भाऊ चांगल्या नोकरीला लागले.एकूण बाबांच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक चालले आहे,”
राजाभाऊ आजगावकर यांनीही त्यांच्या आठवणीना उजाळा दिला होता…ते लिहितात.
“माझे एक परममित्र व व्यवसायबंधू बाबा कोनसकर २८-१-१९८९ रोजी निधन झाले. दशावतारी नाट्यभूमीच्या आभाळातील चमकत्या ताऱ्याच्या निधनाची बातमी समजताच मी अगदी सुन्न झालो. त्या बातमीने माझ्या जीवनातील अनेक स्मृती जागृत झाल्या.
कै.बाबा माझे परम स्नेही होतेच; पण ते माझे व्यवसायबंधूही होते. कोनशी ता.सावंतवाडी येथील गावातील एका गरीब कुटुंबात बाबांचा जन्म झाला. तुटपुंजे शिक्षण,जेमतेम शेती व काबाडकष्ट करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.सुरवातीपासूनच त्यांना दशावतारी कलेची आवड होती. या आवडीनुसार त्यांनी दशावतार नाट्यव्यवसायात पदार्पण केले. मी आजगांवकर नाट्यसंस्थेचा चालक असताना कै.बाबा आमच्या संस्थेत सर्वसामान्य कलाकार म्हणून वावरत होते. प्रथमतः भटजी,शंकासूर ही त्यांच्या कामाची सुरवात व त्यानंतर बारीकसारिक स्त्री पात्रे, राजपात्र, राक्षसपात्र अशा वेगवेगळ्या भूमिका स्वीकारून त्यांनी दशावतारी नाट्यकलेची सेवा केली.इतकेच नव्हे, तर वेळप्रसंगी एखाद्या गडीमाणसास आजारपण आले तर डोक्यावर सामानाच्या बॅगा घेण्यात कधी कमीपणा मानला नाही.आमच्या संस्थेत असताना त्यांच्या अंगच्या गुणांचा विचार करून या नटावर मेहनत घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव दिला, तर त्यांचा कलाविकास होऊ शकेल या सदिच्छेने मी चार-पाच काल्पनिक पौराणिक नाटके
रंगभूमीवर आणली.काल्पनिक पौराणिक “मणिमल्लासूर” हे कथासूत्र रचले व त्यातला खलनायक ‘मणिमल्लासूर” ही भूमिका कै. बाबा यांना दिली व त्यांच्याकडून ती उत्तम प्रकारे साकार करून घेतली. या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्या नाटकांतील त्यांचा माझा रंगभूमीवरील संघर्ष अद्याप माझ्या नजरेसमोर उभा रहातो. त्या नाटकात फक्त दोनच प्रवेशांत. ब्रह्मदेवाची भूमिका मी करीत असे. तर पहिला प्रवेश “मल्लासूरला वरदान देण्याइतकाच” पण नाटकाच्या शेवटच्या प्रवेशात पुष्कळ वेळ जात असे.बाबा व माझ्या संवादाना रसिकांची खूप दाद मिळत असे.”
++
गोमंतकात वाळपईजवळ २७ जानेवारीला रात्री पिसुर्ले या गावी मामा मोचेमाडकर कंपनीचा ‘राजक्रांती’हा काल्पनिक विषयावर नाट्य प्रयोग होता. तो संपला.. आणि सकाळी आठ वाजता अचानक बाबांना अस्वस्थ वाटू लागले.पण ते सावरले, पण ९ वा. पुन्हा त्याना त्रास झाला. छातित कळा आल्या त्यांना लगेचच वाळपईला नेण्यात आले.दवाखान्यात पुन्हा त्रास झाला.उपचार चालू असतानाच दुपारी अकरा वाजता हृदय विकाराच्या तीव्र धक्का आला नि बाबा कोनसकर अनंतात विलीन झाले.
त्यांचे सहकारी..चाहते,
कुटुंबातील सर्वाना बाबांचे अचानक निधन पचवणे कठीण गेले… पण कालाय तस्मैं नमः..! बाबांचे सुपुत्र दादा आणि उदय दशावतारी नाटकांतून भूमिका करू लागले. आज ते तो वारसा पुढे नेत आहेत.
++
नटश्रेष्ठ बाबी नालंग -बाबल नाईक यांचे प्रोत्साहन –
अशावेळी राजाभाऊ आजगावकर यांच्याप्रमाणेच त्यावेळी बाबी नालंग व बाबल नाईक यांनी खूपच सहकार्य केले असे दादा सांगतात.
आपल्या कंपनीत दादांना घेतले व महत्त्वाच्या भूमिका दिल्या व उभे केले. मा.बाबी स्वतः विष्णूचे काम करत तेव्हा जलधराची भूमिका दादांना देत. हरिश्चंद्र तारामती प्रयोगात विश्वामित्रांची भूमिका दादाना देत.अर्जुन स्वतः करत तर दादाना बलराम करायला देत..बाबांनंतर दादा कोनसकर यांना घडवण्यात मा.बाबी नालंग यांची या कलेवरील व सहकारी दिवंगत कलाकारावरील श्रद्धा महत्त्वाची आहे, असे मला वाटते… !”
” मला घडवण्यात बाबल नाईक (नाईक दशावतार कंपनीचे मालक) यांचे पण मोलाचे सहकार्य आहे, कारण, पांडुरंग डामरेकर,वासू सामंत असे मोठे खालनायक करणारे असताना मी नवोदित असून बाबल नाईक यांनी प्रोत्साहन दिले.मी यांच्या कंपनीत असताना,त्रिपुरासूर,
सेंन्यापाल अशा मोठ्या भूमिका देऊन मला पुढे आणले,प्रोत्साहन दिले.
माणसे ‘देवमाणसे’ होतात ती अशी..!दादांचा भाऊ उदय पण उत्तम कलाकार आहे.
या दोघांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेला.दादा कोनसकर तर नवोदितांना प्रशिक्षणही देतात. या लेखासाठी दादांनी मला आपल्याकडील एकमेव फोटो उपलब्ध करून दिला. तो कलावंताच्या ग्रुप फोटोतील आहे. मूळ ग्रुपफोटो कालप्रवाहात
नष्ट झाला.आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा नटश्रेष्ठ बाबा कोनसकर यांचा फोटो अधिक उठावदार करता येईल मी तो करून घेणार व दादांकडे देणार आहे.
बाबा कोनसकर यांना जावून आता तीस वर्षे उलटली.पण त्यांच्या आठवणी आजही रसिकश्रोते सांगतात त्या गोळा करायल्या हव्यात.पण वेळ आहे कुणाकडे.. ? प्रत्येकजण आपआपल्या व्यापात गुंतला आहे.
मी १९८५ दरम्यान मोरगाव- आडाळीला असताना त्यांच्या दोन भूमिका पाहिल्या होत्या .
आमच्या आडाळीचे कृष्णा आत्माराम गावकर(गुरुजी) व सगुण सावंत माझ्यापाशी त्यांच्या आठवणी काढत पण आता ते दोघेही आता हयात नाही.. नाहीतर आणखी काही पैलू समोर आणता आले असते. असो.
जनसामान्यात..रसिकांत असलेल्या बाबा कोनसकर यांच्या आठवणी हळूहळू अशाच विरून जातील..त्यापैकी काही अशा माध्यमांतून पुढील पिढींपर्यन्त पोचाव्यात म्हणून माझा हा लेखन प्रपंच ..!
कै.बाबा कोनसकर यांना विनम्र अभिवादन. !
++
कै. बाबांनी अनेक दशावतार नाट्यमंडळे व आजगावकर दशावतार नाट्यमंडळ अशा अनेक नाट्यसंस्थेतून तोंडाला रंगसफेती केल्यापासून शेवटपर्यंत दशावतारी नाट्यकलेची सेवा केली.गरिबी,दारिद्रय , काबाडकष्ट, दुःख याला प्रतिभावान कलाकार सामोरा गेला..बाबा निगर्वी,मनमिळावू, हसतमुख होते.आपल्या स्नेहबांधवांशी, व्यवसायबंधूंशी ते कधीच तुटकपणे वागले नाहीत. अशा थोर मनाच्या दशावतारी कलावंताच्या कुटुंबीयांना बाबांच्या अचानक व अकाली निधनानंतर त्यांना मदत मिळावी म्हणून राजाभाऊंनीही खूप प्रयत्न केले.दशावतारी नाट्यकला व्यावसायिक मित्रबांधव, दशावतारी नाट्यचालक, मालक नम्रतेचे आवाहन आहे होते .
“कै.बाबांच्या गरीब संसाराला त्यांची मुले, बायको परिवाराला, त्यांच्या मुलाबाळांच्या किंवा संसाराला काडीचा आधार मिळावा म्हणून सर्व दशावतार कलाकार मंडळीनी यथाशक्ती करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली होईल.” असे त्यावेळी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते.
त्यावेळी म्हणजे १९८९ साली आ.राजाभाऊंनी त्यांना श्रद्धांजली
वहाताना म्हटले आहे.
“बाबा…तुम्ही आमच्यातून गेलात पण तुमच्या स्मृती आम्हां सर्व कलाकारांच्या जीवनात कायम राहतील.ईश्वर तुमच्या आत्म्यास चिरशांती देणार…!”

(9665996260)