साडवली सह्याद्रीनगर येथे विहिरीत पडून प्रौढाचा मृत्यू

crime

देवरूख । प्रतिनिधी

देवरुख नजीकच्या साडवली सह्याद्रीनगर येथे विहिरीत पडून ४८ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली.

याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिपक लक्ष्मण बांडागळे (वय- ४८, रा. साडवली सह्याद्रीनगर) असे मृत प्रौढाचे नाव आहे. दिपक बांडागळे हे बुधवारी सायंकाळी ७ वाजता घराबाहेर पडले होते. मात्र ते रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने घरच्या मंडळींनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ते कोठेच आढळून आले नाहीत. गुरूवारी पुन्हा त्यांचा शोध घेण्यात आला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दरम्यान त्यांच्या मुलग्याला घराजवळच असणाऱ्या विहिरीत त्यांचा मृतदेह दिसून आला.

यानंतर या घटनेची माहिती देवरूख पोलीस ठाण्याला देण्यात आली. यानुसार पोलीस नाईक संतोष सडकर व संदीप जाधव यांनी घटनास्थळी जावून पाहणी व पंचनामा केला. विहीर तब्बल ४० फुट खोल असल्यामुळे मृतदेह विहीरीबाहेर काढणे कठीण होते. त्यामुळे देवरूखमधील राजू काकडे हेल्प अँकँडमीच्या टिमला पाचारण करण्यात आले. अँकँडमीच्या कार्यकर्त्यांनी मृतदेह विहीरीबाहेर काढला. संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुलगे असा परिवार आहे.