इंडिया सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल कोतळूकचा सुपुत्र ओंकार बागकर याचा सत्कार

गुहागर । प्रतिनिधी

राजा हिंदुस्थानी क्रिडा मंडळ कोतळूक उदमेवाडीचा सदस्य व खेळाडू ओंकार वैभव बागकर याने उत्तर प्रदेश गाझियाबाद येथे झालेल्या टि टेन सिझन क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना एका सामन्यात सामनावीराचा बहुमान पटकावत चमकदार कामगिरी केली त्याबद्दल तसेच त्याची निवड झाल्याबद्दल त्याचा राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी च्यावतीने पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र संघात खेळत असलेल्या ओंकार बागकरच्या संघाला सेमीफायनल मध्ये पराभव पत्करावा लागला. ओंकार ने याआधी रत्नागिरी जिल्हा संघाकडून सिझन तसेच टेनिस क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू म्हणून नावलौकिक प्राप्त केले आहे. लहानपणापासून क्रिकेटची आवड असल्याने राजा हिंदुस्थानी क्रिकेट संघ कोतळूक या स्थानिक संघातून खेळतानाच त्याला अनुभवी खेळाडू राजू कनगुटकर यांनी सर्वप्रथम सिझनचे प्रशिक्षण दिले त्यानंतर त्याने सराव, मेहनत व जिद्दीने आपला खेळ उंचावला फक्त डावखुरा गोलंदाज म्हणून न राहता अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. टि टेन स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल ओंकारला खूप आनंद झाला असून त्यासाठी त्याचे वडील,आई, कुटुंबातील वडीलधारी मंडळी, नातेवाईक, प्रशिक्षक रोहित कुमार मिश्रा (नागपूर), निनाद शिर्सेकर (राजापूर) यांचे आशिर्वाद व पाठिंबा तसेच मित्र परिवारांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे चांगला खेळ करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण झाला असे सांगत यापुढे सुद्धा जिद्द,चिकाटी,मेहनतीच्या जोरावर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करून आपल्या भागातील तरूण खेळाडूंना व्यासपीठ मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ओंकार हा गुहागर तालुका भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते भाई (सायबाशेट) बागकर यांचा नातू आहे. कोतळूक येथे आल्यानंतर त्याचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोतळूक येथे छोटेखानी सत्कारावेळी मंडळाचे अध्यक्ष उल्हास आरेकर, उपाध्यक्ष सचिन ओक, खजिनदार समीर ओक,नरेश बागकर, समीर आरेकर, अनिल आरेकर, गणेश बागकर, वडील वैभव बागकर,रूपेश बेलवलकर, अनिकेत आरेकर,रोशन महाडीक, मयुर आरेकर,शुभम महाडीक,पारस बागकर, सौरभ आरेकर, मनिष आरेकर,सोहम कोळवणकर,सोहम आरेकर,ओम आरेकर उपस्थित होते.