देशातील १ लाख २० हजार शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक ; महाराष्ट्रात ८० हजार शिक्षकांची गरज

नवी दिल्ली : देशातील सुमारे १ लाख २० हजार शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक आहे. त्यापैकी ८९ टक्के शाळा ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे सद्य परिस्थिती पाहता भारतात ११.१६ लाख शिक्षकांची गरज असल्याचे युनेस्कोच्या अहवालात सांगण्यात आले आहे. तर महाराष्ट्र, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये ६० ते ८० हजार शिक्षकांची गरज असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

पीरियोडिक लेबर फोर्स सर्व्हे २०१८-१९च्या आकडेवारीनुसार, एक शिक्षक असलेल्या शाळांमध्ये अरुणाचल प्रदेश (१८.२२ टक्के), गोवा (१६.८ टक्के), तेलंगणा (१५.७१ टक्के), आंध्र प्रदेश (१४.४ टक्के), झारखंड (१३.८१ टक्के), उत्तराखंड (१३.६४ टक्के), मध्य प्रदेश (१३.०८%) आणि राजस्थान (१०.०८%) इतके प्रमाण आहे.

ग्रामीण भागातील महिला शिक्षकांचे प्रमाण शहरी भागातील महिला शिक्षकांच्या तुलनेत कमी आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये २८ टक्के महिला आहेत तर शहरी भागांत ६३ टक्के आहेत. तसेच ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्ये महिलांचे प्रमाण २४ टक्के आणि शहरी भागात ५३ टक्के आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत ६९ टक्के शिक्षकांची गरज असल्याचे अहवालात मांडण्यात आले आहे.

त्रिपुरा राज्यात ३२ टक्के महिला शिक्षकांची कमी आहे. त्यानंतर आसाम, झारखंड आणि राजस्थान या राज्यांत महिला शिक्षक कमी प्रमाणात आहेत.

‘स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट -२०२०’ हा शिक्षकांवर केंद्रित असलेला अहवाल आहे. पीरियोडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) आणि शिक्षणासाठी एकात्मिक जिल्हा माहिती प्रणाली (UDISE)च्या विश्लेषणावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. प्राध्यापक पद्मा एम सारंगपाणी यांच्या नेतृत्वाखालील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबईतील तज्ज्ञांच्या मदतीने युनेस्कोला हा अहवाल तयार करण्यास मदत केली.