केंद्राने १ लाख कोटी गरिबांच्या खात्यांवर केले जमा

पंतप्रधान मोदींनी केंद्रासोबतच योगी सरकारच्या कामाचे केले तोंडभरुन कौतुक

लखनऊ (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका कार्यक्रमात केंद्र सरकारसोबतच उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या कामांचे तोंडभरुन कौतुक केले. केंद्राने जवळजवळ १ लाख कोटी रुपये गरिबांच्या खात्यांवर थेट जमा केल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘२०१४ च्या आधी जे सरकार होते त्यांनी शहरांमधील योजनांमध्ये केवळ १३ लाख घरे मंजूर केली. त्यापैकी ८ लाख घरे बनवण्यात आली. पीएम आवास योजनेअंतर्ग १ कोटी १३ लाखांहून अधिक घरांच्या उभारणीसाठी परवानगी दिली. ५० लाख घरे देण्यात आली. आम्ही घरांच्या डिझाइनपासून निर्मितीपर्यंत सर्व गोष्टी घरे वापरणाऱ्यांना ठरवायला सांगितल्या. दिल्लीत एसी कार्यालयांमध्ये बसून आम्ही निर्णय घेतलेले नाहीत. आम्ही घरे किती मोठी असतील याचा निर्णय घेतला. २२ स्वेअर मीटरपेक्षा घरे छोटी असणार नाहीत, असे आम्ही ठरवले. आम्ही थेट गरिबांना त्यांच्या खात्यांवर घरे बनविण्यासाठी पैसे पाठवले. केंद्राने जवळजवळ १ लाख कोटी रुपये गरिबांच्या खात्यांवर थेट पाठवलेत. आपल्याकडे काहीजण म्हणतात की मोदींनी काय केले? मी पहिल्यांदाच तुम्हाला असे काही सांगू इच्छितो की माझे जे सहकारी झोपड्यांमध्ये राहत होते, ज्यांच्याकडे पक्के घर नव्हते अशा ३ कोटी कुटुंबांना या योजनेने लखपती होण्याची संधी मिळाली आहे’, असेही मोदींनी यावेळी नमूद केले.

मोदी म्हणाले, ‘देशात २५ ते ३० कोटी कुटुंबं आहेत. तीन कोटी कुटुंब लखपती झाली आहेत. मला ते दिवसही आठवतात, जेव्हा फार प्रयत्न करुनही उत्तर प्रदेश राज्य घरे उभारण्यामध्ये पुढे जात नव्हते. गरिबांना घरे बांधण्यासाठी केंद्र पैसे देत होते. योगी सरकार येण्याआधी जे सरकार होते त्यांना गरिबांसाठी घरेच बनवायची नव्हती. आधी जे होते त्यांच्याकडे आम्हाला विनंती करावी लागायची’.

‘आम्ही युपीसाठी २०१७ आधी १८ हजार घरे निश्चित केली. मात्र येथील सरकारने १८ घरे सुद्धा बनवून दिली नाहीत. पैसा होता, परवानगी होती मात्र जे सत्तेत होते ते नेहमीच कामाच्या आड यायचे. त्यांचे हे कृत्य येथील लोक विसरणार नाहीत. योगी सरकार सत्तेत आल्यानंतर शहरांमधील ९ लाख गरिबांना घरे बांधून देण्यात आली. १४ लाख घरांचे बांधकाम सुरु आहे. वीज, पाणी, गॅस, शौचालय अशा सेवाही दिल्या जात आहेत, असेही मोदींनी सांगितले.

मोदी म्हणाले, ‘स्वनिधी योजनेत २५ लाखांपेक्षा अधिक व्यक्तींना २५०० कोटी रुपयांची मदत देण्यात आली. या योजनेचा सर्वाधिक लाभ घेणाऱ्या पहिल्या ३ शहरांमध्ये उत्तर प्रदेशमधील २ शहरांचा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर लखनऊ आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर कानपूर आहे. त्यामुळे आता भारत डिजीटल पेमेंटमध्ये विक्रम करत आहे व बदलत्या तंत्रज्ञानातील भारताची ताकद आता दिसत आहे’.

यंदा दिवाळीत पुन्हा लावा दिवे…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस घरा-घरांमध्ये दिवा लावण्याचे आवाहन केले होते. त्याचद्धतीचे आवाहन मोदींनी पुन्हा एकदा केले असून यंदा १८ लाख दिवे लावण्यासंदर्भातील शब्द मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे मिळालेल्या लाभार्थ्यांकडून घेतला आहे. योगी सरकारच्या कामांचा पाढा वाचतानाच दिवाळीमध्ये घरटी दोन दिवे लावा, असे आवाहन त्यानी केले आहे. यंदा दिवाळीत आयोध्येमध्ये साडेसात लाख दिवे लावणार असल्याची माहिती आता देण्यात आली. मी उत्तर प्रदेशला आवाहन करतोय की राज्यामध्ये ज्यांना ज्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे मिळाली आहेत त्या ९ लाख लाभार्थ्यांनी आपआपल्या घरांमध्ये प्रत्येकी दोन दिवे लावावेत. म्हणजे अयोध्येमध्ये साडेसात लाख दिवे लागतील, तेव्हा एकाचवेळी १८ लाख दिवे लावले जातील. भगवान रामालाही याचा आनंद होईल असेही मोदी म्हणालेत.