सप्तलिंगी नदीत बेपत्ता तरुणाचा मृतदेह 48 तासांनी सापडला

देवरुख । प्रतिनिधी

संगमेश्वर तालुक्यातील पूर-झेपलेवाडी येथील बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह ४८ तासांनी कुडवली बौद्धवाडी येथे नदीपात्रात शुक्रवारी 5 वाजता मिळून आला आहे. या बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची टीम शुक्रवारी सकाळी या ठिकाणी दाखल झाली होती.

पूर-झेपलेवाडी येथील सहाजण बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जांभळीचे उतरण या ठिकाणी बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेले होते. यातील अशोक सोनू झेपले, हर्ष संजय घाटकर व संजय सिताराम घाटकर यांनी नदीपत्रात पोहण्यासाठी उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही बुडू लागले. ही बाब नदी काठावरील अन्य तिघांच्या लक्षात येताच त्यांनी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हा प्रकार गावातील ग्रामस्थांना कळताच त्यांनी हे तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

अशोक सोनु झेपले व हर्ष संजय घाटकर यांना नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले. या दोघांनाही उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर यातील अशोक झेपले याना मृत घोषित करण्यात आले. त्यांनतर बेपत्ता झालेल्या संजय घाटकर यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली. बुधवार पाठोपाठ गुरुवारी ही दिवसभर स्थानिक ग्रामस्थ व राजू काकडे हेल्प अकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी नदी परिसर पिंजून काढला. दरम्यान, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. संजय घाटकर यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची टीम शुक्रवारी सकाळी ९ वाजता चिपळूणहुन दाखल झाली. दोरी, लाईफ जॅकेट, बोट आदी यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून शोध मोहिमेला प्रारंभ झाला. ही मोहीम सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू होती, मात्र या टीमच्या हाती काहीच लागले नसल्याची माहिती तहसीलदार सुहास थोरात यांनी दिली आहे.

यानंतर ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरूच ठेवली होती. दरम्यान, सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झालेल्या संजय घाटकर यांचा मृतदेह कुडवली बौद्ध वाडी येथे मिळून आल्याची माहिती पोलिस ठाण्यातून प्राप्त झाली आहे. देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव व सहकार्यानी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. संजय घाटकर यांचा मृतदेह मिळून आल्याने तब्बल ४८ तासानंतर शोध मोहिमेला पूर्णविराम मिळाला आहे.