वैभववाडी : दागिने पॉलिशच्या बहाण्याने आलेल्या दोन संशयितांना ग्रामस्थांनी पकडले : आचिर्णे कडूवाडी येथील घटना

 

दोघांनाही केले पोलिसांच्या स्वाधीन

वैभववाडी । नरेंद्र कोलते
दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन संशयितांना आचिर्णे कडूवाडी ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तबरेज मोहम्मद आलम वय 37 व मोहम्मद मसूद अलम वय 40 रा. भागलपूर बिहार अशी त्या संशयितांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वा. सुमारास घडली.

ते दोन संशयित गुरुवारी सकाळी पाटणा ते वास्को या ट्रेन मधून आले होते. गुरुवारी ते कुडाळ स्टेशनवर उतरले. व रात्री ते तिथेच राहिले. शुक्रवारी दागिने पॉलिश करण्यासाठी त्यांनी आचिर्णे कडूवाडी गाठली. त्यांच्याजवळ पाँलीश पावडर होती. गावातील एका महिलेने त्यांच्याकडे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले. दरम्यान त्या महिलेला त्यांचा संशय आला. त्या महिलेने स्थानिक लोकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. स्थानिक तरुणांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. ते कोणतेही माहिती देत नसल्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या दोन संशयितांना ताब्यात घेतले. परंतु त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास कोणीही पुढे आले नाहीत. पोलिसांनी त्यांची संपूर्ण माहिती गोळा केली. सदर माहिती त्यांनी बिहार पोलिसांकडे पाठवली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे की नाही याबाबत खात्री केली जाणार आहे.
जनतेने अशा संशयित लोकांपासून सावध रहावे. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. संशयित आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.