शेतमळ्यात आढळला महिलेचा सडलेला मृतदेह ; चेंदवण ठुम्बरेवाडी येथील घटना

कुडाळ | प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील चेंदवण ठुम्बरेवाडी येथील शेतमळ्यात गुरूवारी एका ५० ते ५५ वर्षीय महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. संबंधित महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. याची खबर संदीप ठुम्बरे यांनी दिली आहे. याबाबत निवती पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

या प्रकरणी निवती पोलिसांनी दिलेली माहिती अशी- संदीप ठुम्बरे हे काल सायंकाळी गणपती विसर्जना बाबत नातलगांना सांगण्यास शेतमळ्यातून जात असता त्यांना वाटेत दुर्गंधी येत असल्याचे दिसले. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एका अनोळखी महिलेचा मृतदेह सडलेल्या स्थितीत दिसून आला. हा मृतदेह पाण्यात व चिखलात असल्याने तिची ओळख पटत नव्हती. याबाबतची माहिती त्यांनी निवती पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक जी. व्ही. वारंग, पोलिस कर्मचारी एस. बी. नाईक, एस. पी. पाटकर, एम. जे. कांदळगावकर, व्ही. व्ही. लोणे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मृतदेह ओरोस येथे नेण्यात आला आहे.

संबंधित महिलेच्या अंगावर पायवरी गुलाबी पिवळसर रंगाची साडी, पांढऱ्या रंगाचा ब्लाउज, हातात बांगड्या असून उंची अंदाजे पाच फूट आहे. या व्यक्ती विषयी कोणास माहिती असल्यास संबंधितांनी निवती पोलिस ठाणे ०२३६६-२२८२०० येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.