वैभववाडी : आंबेडकरी चळवळीतील मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड

जाहिरात-2

 

दिवंगत माई यादव यांना बौध्द संघाच्या वतीने श्रध्दांजली : अभिवादन सभेचे आयोजन

वैभववाडी | प्रतिनिधी
वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ ( ग्रामीण) अध्यक्षा दिवंगत शुभांगी उर्फ माई यादव यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान सर्वांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायक आहे. संघाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी केलेले काम तालुकावासियांच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या अकाली निधनाने एकूणच आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा शब्दात मान्यंवरांनी त्यांना अभिवादन केले.
वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळाच्यावतीने अध्यक्षा दिवंगत शुभांगी ऊर्फ माई यादव यांच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळीच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे कार्याध्यक्ष सुभाष कांबळे हे होते. यावेळी मुंबई अध्यक्ष यशवंत यादव, माजी उपाध्यक्ष भगवान खांबाळेकर, सरचिटणीस रविंद्र पवार, उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, संतोष कदम, सहसचिव शरद कांबळे, संजय जंगम, माता रमाई महिला मंडळाच्या रुचिता कदम, शरयु कदम, ऋचा पवार, श्रीपत कुसूरकर, अमर कदम, मंगेश कांबळे, प्रफुल्ल जाधव, प्रमोद जाधव, दिपा जाधव, त्याचप्रमाणे सत्यशोधक संघटनेचे काॕ.अंकुश कदम आदी उपस्थित होते.
यावेळी काॕ.अंकुश कदम म्हणाले, एखादया संघटनेचे नेतृत्व एका स्ञीकडे देणे ही कृती आदर्शवत आहे. माईंनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत सर्व महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा आदर्श घेऊन महिलांनी पुढे यायला पाहीजे असे सांगितले. तर शरद कांबळे यांनी माईंच्या जीवनावर स्वरचीत सादर केलेल्या गीताने उपस्थितांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. कार्यक्रमाचे सूञसंचलन प्रतिक पवार तर प्रास्तावना रविंद्र पवार यांनी केली.आभार रुपेश कांबळे यांनी मानले.

दिवंगत माई यादव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नाधवडे येथील प्रेमानंद कमळाजी यादव यांनी संघटनेला झेराॕक्स मशिन भेट म्हणून दिली. त्याचे अनावरण माई यादव यांचे चिरंजीव संजीव यादव यांच्या हस्ते करण्यात आले.