‘फोनपे’वर कॅश बॅक रिवॉर्ड लागल्याचे सांगत वेतोशीच्या तरुणीला 1 लाख 34 हजारांचा गंडा

जाहिरात-2

रत्नागिरी | प्रतिनिधी
फोन पे कंपनीकडून बोलत असल्याचे सांगत तुम्हाला कॅशबॅक रिवॉर्ड लागले असल्याची बतावणी करून तरुणाची सुमारे 1 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना शनिवार 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 3 वा. कालावधीत वेतोशी येथे घडली.

नितीन कुमार सिंग असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात नंदिनी लहू निंबरे (22,रा.वेतोशी खालचीवाडी, रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी त्यांना अज्ञात क्रमांकावरून फोन आला. बोलणाऱ्याने मी फोन पे कंपनीकडून बोलत असल्याचे सांगत तुम्हाला 5 हजार रुपयांचे कॅशबॅक रिवॉर्ड लागले असून एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर अँप्लिकेशन कोड आणि एटीएम पिन घेऊन निंबरे यांच्या खात्यातील 1 लाख 33 हजार 951 रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निंबरे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.