संततधार पावसामुळे राजापूरात गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण

जाहिरात-2
  • अर्जुना नदीला पूर
  • दरड कोसळल्याने पाचल-अणुस्कुरा मार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प
  • साखरीनाटेत विजपुरवठा खंडीत
  • वाडापेठ येथे घराव झाड कोसळून नुकसान

राजापूर | वार्ताहर

ऐन गणेशोत्सवात संततधार पडणाऱ्या पावसामुळे अर्जुना नदीला पूर आला असून पावसामुळे तालुक्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तर अतिवृष्टीमुळे अणुस्कुरा घाटात मध्यरात्री पुन्हा दरड कोसळली असून या मार्गावरील वाहतुक काही काळ बंद पडली होती. ऐन गणेशोत्सवात संततधार पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

जुलैच्या शेवटच्या आठवडयात तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाचा जोर ओसरला होता. मात्र गणपती उत्सवाच्या प्रारंभापुर्वीच पुन्हा एकदा पावसाने तालुक्यात जोर धरला आहे. गेले चार ते पाच दिवसांपासून तालुक्यात संततधार संततधार धरली आहे. रविवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढल्याने तालुक्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तर राजापूर पाचल अणुस्कुरा मार्गावर अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरची वाहतुक ठप्प झाली आहे.
तर साखरीनाटे येथे विज ट्रान्सफर्मरवर झाड कोसळल्याने या भागातील विजपुरवठा खंडीत झाला आहे. तर वाडापेठ येथील विलास मारूती गावकर यांच्या घरावर चिंचेचे झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले आहे.

तालुक्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धुम सुरू आहे. मात्र संततधार पडणाऱ्या पावसामुळे गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे. संततधार पावसामुळे घराबाहेर पडता येत नसल्याने गणेश भक्तांचा हिरमोड झाला आहे.