सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ९६ व्या उत्सवाला प्रारंभ

राजापूर समर्थनगर येथे साजरा होत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिष्ठापीत करण्यात आलेली श्रींची मुर्ती, मुर्तीकार निलेश रहाटे यांच्या हस्तकौशल्यातून साकारली आहे.
जाहिरात-2
कोरोना संकटामुळे साधेपणाने उत्सव साजरा होणार

राजापूर | वार्ताहर

शहरातील समर्थनगर येथील मारूती मंदिर धर्मशाळेत साजरा होणाऱ्या येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ९६ व्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर अत्यंत साधेपणाने व उचित दक्षता बाळगुन साजरा केला जाणार आहे.
शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या सार्वजनिक गणेशोत्सवात यावर्षी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. उत्सवाचे आकर्षण असलेले लेझीम, ढोलपथके, पारंपारिक युध्दकला प्रात्यक्षिके यावर्षी होणार नाहीत. गदीं होतील असे कार्यक्रम यावर्षी टाळण्यात आले आहेत.

यावर्षीच्या उत्सवासाठी गणेश मुर्ती देण्याचा मान श्रीयांश प्रसन्न नवरे यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी सोडत पध्दतीने मूर्तीदाता निवडला जातो. मूर्तिदाता योजनेसाठी मारूती मंदिर धर्मशाळा येथे चिठ्यांची पेटी ठेवण्यात आली आहे. २१ रूपये भरून या योजनेत भाविकांना सहभागी होता येणार आहे.

गुरूवार १० सप्टेंबर ते शनिवार १८ सप्टेंबर असा नऊ दिवसांचा हा उत्सव साजरा होत आहे. गुरूवारी सकाळी १० वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना होवून उत्सवाला प्रारंभ झाला आहे. उत्सव काळात दररोज नित्यपूजा, आरती असे कार्यक्रम होणारच आहेत. गुरूवार १६ रोजी सकाळी ९ वाजता महिलांचे अथर्वशीर्ष पठण, शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता पुरूषांची सहस्त्रावर्तने आदी कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी दुपारी ३ वाजता श्रींचे विसर्जन होवून उत्सवाची सांगता होणार आहे.