नेत्रदान एक राष्ट्रीय गरज

जाहिरात-2

जगातील एकूण नेत्रहीन व्यक्तीपैकी २० टक्के म्हणजे सव्वा कोटी नेत्रहीन भारतात असून त्यातील ३० लाख नेत्रहीन व्यक्तींना नेत्ररोपणाने दृष्टी प्राप्त होऊ शकते. सगळ्याच नेत्रहीनाना नेत्ररोपणाने दृष्टी मिळू शकत नाही . ज्यांची परपटले निकामी झाली आहेत परंतु बाकीचा डोळा चांगल्या स्थितीत आहे , त्यांनाच दृष्टी प्राप्त होऊ शकते कारण नेत्ररोपण म्हणजे संपूर्ण डोळ्याचे रोपण नव्हे तर फक्त ह्या पटलाचेच रोपण होय . ह्यालाच सर्वसाधारपणे आपण नेत्ररोपण म्हणतो मृत व्यक्तींच्या नेत्रदानामुळेच हे नेत्ररोपण करणे शक्य होते .

* नेत्रदान हे रक्तदानाप्रमाणे जिवंतपणी नव्हे तर ते मरणोतरच करावयाचे असते . कुठल्याही जिवंत व्यक्तीस नेत्रदान करता येत नाही . तीस लाखांना दृष्टी देणे आपल्याला फारच सोपे वाटेल, पण तसे नाही कारण आपली भयानक , तिडीक आणणारी निंद्य अनास्था आणि ‘ मला काय त्याचे ही वृत्ती .

* दरवर्षी भारतात सुमारे ८० लाख मृत्यू होतात . परंतु ह्यातील फक्त सुमारे ३० हजार व्यक्तींचेच नेत्रदान होते . भारतात जी नेत्ररोपणे होतात त्यासाठी मोठ्या प्रमाणात दान केलेले नेत्र हे श्रीलंकेसारख्या आपल्या छोट्याशा शेजारी राष्ट्राकडून आलेले असतात.भुवया उंचावल्या ना ? *

ही भयानक वस्तुस्थिती आपल्यासारख्या १४० कोटींपेक्षाही अधिक लोकसंख्येच्या मोठ्या राष्ट्राला आत्यंतिक लाजिरवाणी नव्हे का ? * आपला देश विविध आघाड्यांवर स्वयंपूर्ण होत आहे . तो या आघाडीवरही स्वयंपूर्ण व्हावा असे आपल्यासही नक्कीच वाटेल .म्हणूनच ही एक राष्ट्रीय गरज ठरते . नेत्रदान हे फार सोपे असून त्यासाठी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे .
> जन्मजात बालकापासून अगदी १०० वर्षाच्या स्त्री – पुरुषांपर्यंत कोणाचेही नेत्रदान होऊ शकते . कुठल्याही प्रकारचा चष्मा लावणारे , मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेले , मधुमेही आणि रक्तदाब पिडीतही नेत्रदान करू शकतात .
> मृत व्यक्तीस एड्स , अलार्क ( रेबीज ) , कावीळ , कर्करोग , सिफिलिस , धनुर्वात किंवा विषाणूंपासून होणारे रोग असल्यास अशा व्यक्तींचे नेत्र , रोपणासाठी निरुपयोगी ठरतात . परंतु ही नेत्रपटले सराव आणि संशोधनासाठी वापरतात . तेव्हा अशा व्यक्तीचे नेत्रदान व्हावे की नाही हे कृपया नेत्रपेढीच्या डॉक्टरांनाच ठरवू द्यावे . आपणच काहीतरी ठरवू नये .

> अपघातात मृत झालेल्या व्यक्तींचे डोळे , म्हणजेच नेत्रपटल चांगल्या स्थितीत असल्यास स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने नेत्रदान होऊ शकते .
> ज्यांचे पारपटल चांगले आहे , परंतु इतर काही दोषांमुळे कायमचे अंधत्व आलेले आहे अशा अंधांचेही नेत्रदान होऊ शकते हे फार महत्वाचे ध्यानात ठेवावे म्हणजेच अंध व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात .
> मृत्यूनंतर लवकरात लवकर , ३ ते ४ तासांपर्यंत ( अपवादात्मक स्थितीत ६ तासापर्यंत ) नेत्रदान होणे आवश्यक आहे . → नेत्रदानाची इच्छा मृत्युपत्रात व्यक्त करू नये ते निरर्थक होते . नेत्रदानासाठी जवळच्या नेत्रपेढीचे प्रमाणपत्र मात्र ज़रूर भरावे . त्यातून आपली इच्छा लेखी स्वरूपात व्यक्त होऊन ती साक्षीदार म्हणून सही करणाऱ्या जवळच्या नातलगांना , वारसांना , माहित होते . शेजारी मित्र – मैत्रिणी यांनाही आवर्जून ही माहिती द्यावी . एकत्र बसून या विषयी चर्चा करुन ते प्रतिज्ञापत्र सामूहिकपणे भरणे सर्वोत्तम ठरते . त्यातून आपली इच्छा आणि या कार्यास एक सामूहिक बळ प्राप्त होते.तसेच आपली इच्छा फलद्रुप होण्याची शक्यता वाढते .

> नेत्रपेढीकडून आपल्याला डोनर कार्ड मिळते , ते कायम आपल्यासोबत बाळगावे .

> आपल्या डायरीत आसपासच्या नेत्रपेढ्यांचे दूरध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत . घरातील भिंतीवरसुद्धा लावावेत .

> नेत्रदात्याच्या मृत्यूनंतर नेत्रपेढीला लगेचच नेत्रदानाविषयी कळविणे अत्यंत महत्वाचे असून हे काम शेजारी , नातलग मित्र – मैत्रिणी करू शकतात .

> त्यावेळेच्या भावनात्मक स्थितीचे कारण काही जण सांगतात परंतु हे लटके आहे . अशा स्थितीतच जेव्हा आपण नातलग , ओळखीच्यांना वगैरे आपण दूरध्वनीवरून कळवतो तसेच नेत्रपेढीलाही दूरध्वनीवरून कळवायचे असते एव्हढेच .

> मृत व्यक्तीने ज्या नेत्रपेढीचे प्रतिज्ञापत्र भरले असेल त्याच नेत्रपेढीला कळवणे आवश्यक नाही.तर त्या ठिकाणी असलेल्या नजीकच्या नेत्रपेढीला कळविणे वेळेच्या दृष्टीने महत्वाचे आहे .

> नेत्रदानात धार्मिक बंधन नसून मृत व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरलेले नसतानाही मृत व्यक्तीचे वारस त्या मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात . ह्या दृष्टीने नेत्रदानाचे महत्व राष्ट्रीय आवश्यकता लक्षात घेता कळकळीचे आवाहन करावेसे वाटते की आपल्या परिसरात नात्यात कुणाचा मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या नातलगांना नेत्रदानाविषयी जरूर सुचवावे , त्यासाठी प्रवृत्त करण्याचे अवश्य प्रयत्न करावेत.अशाप्रकारे आपण सुद्धा जिवंतपणी नेत्रदानाविषयक मोलाचे कार्य करू शकाल .
नेत्रपेढीला कळवितानाच कृपया खालील बाबी निश्चितपणे पार पाडाव्यात . डॉक्टरांकडून मृत्यू प्रमाणपत्र त्वरित मिळवावे..शक्यतो आपल्या डॉक्टरांनाच १० सी .सी .रक्ताचा नमुना घेऊन ठेवण्यास सांगणे . अन्यथा नेत्र घेते वेळेला रक्ताचा नमुना घेतला जातोच . मृताचे डोळे व्यवस्थित बंद करून पापण्यांवर बर्फ अथवा ओल्या कापसाच्या / कापडाच्या घड्या ठेवाव्यात.शक्य असल्यास आय ड्रॉप्स डोळ्यात टाकावेत . मृत व्यक्ती ज्या खोलीत असेल त्या खोलीतील पंखे बंद करावेत , तसेच वातानुकुलन यंत्र असल्यास ते जरूर चालू ठेवावे . जवळ प्रखर दिवे नसावेत . मृत व्यक्तीस शक्यतो कॉटवर ठेवावे आणि मृत व्यक्तीचे डोके साधारण दोन उश्यांवर ठेवावे . नेत्रपेढीला कळवले की नेत्रपेढीचे डॉक्टर मृत व्यक्ती जेथे असेल तेथे येऊन नेत्र काढून नेतात . नेत्र काढण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास लागतो . आणि त्यासाठी जंतुविरहित खोलीची आवश्यकता नसते . नेत्र काढून झाल्यावर कृत्रिम नेत्र किंवा कापसाचे बोळे ठेवून पापण्या व्यवस्थितपणे बंद केल्या जातात त्यामुळे मृत व्यक्तीचा चेहरा विद्रुप वगैरे दिसत नाही . हे नेत्र खास फ्लास्कमधून नेत्रपेढीत नेले जातात.त्यावर काही प्रक्रिया करून ४८ तासांच्या आत नेत्रपेढीच्या प्रतीक्षा यादीप्रमाणे दोन ते सहा उपलब्ध नेत्रहीन व्यक्तींना बसवले जातात . व्यक्ती मृत झाली तरी दान केलेले डोळे दोन ते सहा दृष्टिहीनांना भयाण अंधकारातून बाहेर काढून त्यांना नवजीवनच देण्याचे महान कार्य करतात . आपण सुद्धा हे असे अमूल्य दान करू शकतो.कदाचित जीवनभर आपण समाजाच्या उपयोगी पडू शकत नाही , परंतु आपल्या मृत्यूनंतर अशा नेत्रदानाने जरूर उपयोगी पडू शकतो . दोन ते सहा दृष्टिहिनांच्या रंगहीन जीवनात अमूल्य असे दृष्टीचे रंग भरू शकतो , आणि पर्यायाने त्यांना नवजीवनच देऊ शकतो .
आस्थेचा उधळू वारू,
करूच करू नेत्रदान,
अंधकाराला दूर सारू,
देशबांधवांना दृष्टिदान .

श्री. किशोर सूर्यवंशी – ७३८५२०९२७५ ,
श्री . समीर करमरकर – ९४२२४३०८०५

लायन्स नेत्र रुग्णालय , एम.आय. डी . सी . रत्नागिरी संपर्क लायन्स नेत्रसंकलन केंद्र ७०६६०३३७०७