लोकाश्रया बरोबरच कलाकारांना राजाश्रय सुद्धा मिळावा !.. आलोक गोसावी

जाहिरात-2

धन्य तुम्हारा दर्शन, मेरा मन रमता…

मूर्ती शिल्पांमध्ये जिवंतपणा आणि पावित्र जपणारा कलाकार–आलोक

फोंडाघाट।कुमार नाडकर्णी :

फोंडाघाट च्या इतिहासात स्व. दाजीबा शितोळे, स्व.भोगलेमास्तर,गणपत शितोळे,पालव यांच्या परंपरेत एका युवा कलाकाराचे जिल्ह्यामध्ये उंचावणारे नांव.. आलोक दत्ताराम गोसावी !आज गणेशोत्सवाच्या श्रींची मूर्ती पाहताना आलोकच्या मुर्त्यांमध्ये पावित्य, जिवंतपणा आणि रेखीव- सुबकदारी मुळे घराला घरपण आल्याचा भास होतो.एकीकडे मूर्तिकार आपल्या शाळा बंद करण्याच्या मार्गावर असताना आलोकने नोकरीच्या पाठीमागे न धावता हवेलीनगर मध्ये आपली मूर्तीशाळा वसविली आहे आणि हिंदू धर्मातील शास्त्राप्रमाणे श्रींच्या मूर्ती घडविण्याचे काम सुरू केले.

कला शिक्षकांची पदविका सिंधुदुर्ग कला महाविद्यालय कणकवलीतुन प्राप्त केल्यानंतर आलोक नोकरी मागे न लागतां, लहानपणीचे आवड जोपासतांना, गजानन तायशेटे, नितीन गोरडे यांचेकडे मुर्तीकले मधील अभ्यासपूर्ण बारकावे हेरले. देवबागच्या निखिल कडे सुबकदारपणा, आर्य आर्ट स्टुडिओमध्ये शिल्पकलेचा सराव केला. पेणच्या मूर्ती आणि इको फ्रेंडली मूर्ती यांचाही अभ्यास आत्मसात केला.रंगकामाच्या नवीन शेड्स ,लोकांची आवड आणि ग्राहकांची पसंती याचा सखोल अभ्यास करून कलेचे विविध प्रकार आणि मार्केटिंग आत्मसात केले.शहरात न जाता आज ग्रामीण भागात आपली मूर्ति-शिल्प रंगशाळा उभारून लोकाभिमुख काम करण्याची आलोकची इच्छा आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग मूर्तिकार संघटनेचे पाठबळ मिळत असल्याचे आलोक विनम्रपणे कबूल करतो.

गणपती मुर्त्यांपुरतेच मर्यादित न राहता, पर्यटन जिल्ह्यात सिनेमा- शूटिंग करिता सेट उभे करताना, ग्रामशिल्पसाठी कार्यरत राहणार असल्याचे तो सांगतो. जिल्हा वासियांनी सुद्धा तसेच येथील लोकप्रतिनिधींनी या कलाकारांना लोकाश्रय याबरोबरच राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा, अशी अपेक्षा जिल्ह्यातील कलाकारांच्या वतीने आलोकने प्रशासनाला केली आहे. यातून कलाकारांना प्रोत्साहन मिळताना सर्वांगसुंदर कोकणातील हातांना काम मिळून कोकणचे नाव सातासमुद्रापार जाईल, हा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

यापूर्वी मुंबई- रत्नागिरी सारख्या ठिकाणी सेट उभे करण्यासाठी आलोकने विविध सुबक मूर्ती, स्टॅच्यु, इको-फ्रेंडली साहित्याचा वापर करून केले आहेत. त्याच्या कलेला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने घेतलेल्या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे हस्ते त्याला गौरविले आहे. त्यामुळे यापुढे गावाबरोबरच जिल्ह्याचे नाव उंचावण्याचा मनोदय आलोकने निर्धारपूर्वक बोलून दाखवला .आणि त्यासाठी प्रोत्साहन देणार्‍या सर्वांचे आभार मानले आहेत…..