पाच गावांचा एक गणपती असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील गणेश मंदिरात दर्शनावर मर्यादा !

रत्नागिरी । प्रतिनिधी

पाच गाव एक गणपती हि अनेक वर्षांची ही परंपरा श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरात जपली गेली आहे. गणपतीपुळेसह आजूबाजूच्या पाच गावांत घरांमध्ये गणपती आणला जात नाही. मंदिरातील गणपती हाच त्यांचा गणपती असतो. यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे मंदिरे बंद असताना प्रत्येक गावातील भाविकांना दर्शनाची वेळ ठरवून देण्यात आली असून केवळ मुखदर्शन घेतले जाणार आहे असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे .

श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरात कोरोनामुळे मात्र आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेणे भक्तांना अवघड बनले आहे. यंदा पाच गावांतील प्रत्येकी २५ ग्रामस्थांना श्री गणपतीपुळे मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाजाकडून दर्शन दिले जाणार आहे तर अन्य भक्तांना गणपतीपुळेच्या ऍपवरुन बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.

श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरात पाच गावांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपतीपुळे, नेवरे, मालगुंड, वरवडे, भगवतीनगर या पाच गावांचा हा गणपती असतो. गावकरी घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करत नाहीत. श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरातील गणपती हाच त्यांच्या घरातला बाप्पा असतो. कोरोनामुळे गतवर्षीपासून गणेशोत्सवात बाप्पाचे दर्शन किंवा त्याची पुजाअर्चा करण्याची संधी भाविकांना मिळाली नाही.

यंदा २५ दर्शनार्थींची निवड ग्रामपंचायत स्तरावर केली जाणार आहे. मंदिरातील गणेशोत्सव पुजारी आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. हा उत्सव गणपतीपुळे मंदिर या मोबाईल ऍपवर ऑनलाईन पाहता येणार आहे. सध्या गणपतीपुळे मंदिर व्यवस्थापन गणेशोत्सव तयारीचे नियोजन करत आहे