नांदगाव तिठा येथे कोकण हायवे प्रश्नी जनआंदोलन!

जाहिरात-2

 

समृध्द कोकण संघटना आणि कोकण हायवे समन्वय समितीच्या वतीने आयोजन

नांदगाव | प्रतिनिधी

पनवेल ते झाराप या नियोजित कोकण हायवेच्या निर्मिती मध्ये होत असलेला विलंब, कामाचा निकृष्ट दर्जा,प्रलंबित कामे,नियोजनाचा आणि नागरी सुख सोयींचा अभाव यांचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवार ८ रोजी नांदगाव तिठा येथे सकाळी १० ते १२ च्या दरम्यान जन आंदोलन करण्यात आले. तसेच आंदोलनानंतर गेल्या ७ – ८ वर्षात कोकण महामार्गावर विविध अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोकणवासीयांना मानवी साखळी द्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या जन आंदोलनामध्ये आणि मानवी साखळी मध्ये समृध्द कोकण संघटनेचे संचालक डॉ.दीपक परब, समृध्द कोकण संघटना आणि कोकण हायवे समन्वय समितीचे मुख्य समन्वयक श्री.उत्तम दळवी आणि ह्या आंदोलनाचे मुख्य संयोजक श्री.सुरेश मोरये उपस्थित होते. तसेच स्थानिक नांदगाव समन्वयक समितीचे प्रमुख कार्यकर्ते श्री.पंडित रावराणे,श्री.प्रणय तांबे,श्री.यासीन बटवाले,श्री.दत्ताराम अमृते,श्री.नरेंद्र सावंत,श्री.सुरेंद्र राणे,श्री.सुरेश डामरे तसेच नांदगाव दशक्रोशितील रहिवासी,नांदगाव तिठा येथील व्यापारी,रिक्षा चालक उपस्थित होते.

समृध्द कोकण संघटनेचे संचालक डॉ.दीपक परब यांनी जन आंदोलनासाठी जमलेल्या लोकांना ह्या आंदोलन संबंधी संबोधन केले. तसेच श्री.उत्तम दळवी यांनी समृध्द कोकण संघटना आणि कोकण हायवे समन्वय समितीची कोकण महमार्गासंबधीची तसेच भविष्यात कोकणात येणाऱ्या इतर इफ्रा स्ट्रक्चर प्रकल्पामध्ये असणारी भूमिका जमलेल्या लोकांसमोर मांडली.या आंदोलनाचे मुख्य संयोजक श्री.सुरेश मोरये यांनी जमलेल्या लोकांचे आभार मानले. तसेच भविष्यात कोकण महामार्गासाठी होणाऱ्या आंदोलनात सर्व कोकणवासीयांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन देखील केले.