ठाकरे सरकारसाठी कोरोना म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण : प्रवीण दरेकर

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी
एकीकडे मॉल, पब, डिस्को, बार, मेळावे सुरू ठेवत मंदिरे उघडायची नाही, तर दुसरीकडे हॉस्पिटलना मंदिरे म्हणताना तिथल्या शेकडो डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करायचे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारच्या कथनी आणि कहनीमध्ये च फरक आहे. अन्य राज्यातील कोरोना कमी होत असताना मुख्यमंत्री तिसऱ्या लाटेची भीती दाखवत आहेत कारण कोरोना यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

रत्नागिरीत भाजपच्या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर निशाणा साधला. ते म्हणाले की कोरोना काळात भाजपा नर कोकणात सक्रियपणे काम केले आहे. सर्वसामान्यांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यातूनच आज उदघाटन झालेले ४ कोरोना सेंटर्स असतील किंवा रत्नागिरी शहरातील परकर हॉस्पिटलमध्ये पुरविण्यात आलेल्या आरोग्य सुविधा असतील यासाठी भाजपाने सक्रिय काम केले आहे. मात्र या काळात सत्ताधार्यांनी इथल्या आरोग्य यंत्र भक्कम करणे तर राहुदेत परंतु कोरोनामुळे भयभीत झालेल्या जनतेला पालक म्हणून दिलासा देण्याचेही काम केलेले नाही. खरंतर केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक लसी तसेच निधीही दिला आहे. मात्र त्याचा पुरेसा वापर रुग्ण कल्याणासाठी झाला का संशोधनाचा प्रश्न आहे. एक दोन कोटीत उभे राहू शकणारे एखादे कोव्हीड सेंटर १०-१२ कोटीपर्यंत न्यायचे, ऑक्सिजन सप्लायरचे ठेके बिल्डरांना द्यायचे, एखाद्या शिकवू व्यक्तीला कोरोना सेंटरमध्ये ठेकेदाराकडून नेमायचे आणि त्याचे ठेके आपल्याच माणसांना द्यायची अशी सध्याच्या कोरोना काळातील महाराष्ट्रातील ठाकरे सरकारची स्थिती आहे. या सरकारने कोरोनाकडे सुद्धा भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून पहिले आहे असे प्रतिपादन प्रवीण दरेकर यांनी केले. राज्यात बार, डान्सबार, मॉल सुरु आहेत, सत्ताधाऱ्यांचे मॉल सुरु आहेत अशावेळी आम्ही मंदिरे उघडण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना हॉस्पिटल्स मंदिरे वाटू लागली. तेही बरोबर आहे असे म्हटलं तर मग त्या हॉस्पिट्लसमधील डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने कमी करून ठाकरे सरकार कोणती जनतेची सेवा करते आहे असा सवाल त्यांनी केला.

कोकणी माणसाने शिवसेनेला भरभरून दिले आहे मात्र शिवसेनेकडून सत्ता पाहत असतांहि कोरोना काळात कोणतेही भरीव काम झालेले नाही. अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे असल्याने मुखयमंत्रीपदाचा मुकुट सेनेकडे असला तरीही त्यांच्या मंत्र्यांना अजित पवार यांच्याकडून निधीच दिला जात नाही. मात्र आता इथल्या जनतेच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष सक्षमपणे उभा राहिला आहे. विरोधी पक्षात असूनही आम्ही इथल्या आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत आहोत, नारायण राणे याना केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रिपद देऊन भाजपने इथल्या तरुणांना रोजगार देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पर्यटन, फळफळावळ, मत्स्य प्रक्रिया या सारखे उद्योग निर्माण केले जाणार आहेत. मी स्वतः मुंबई बँकेचा अध्यक्ष असून उद्योग निर्मितीसाठी मीही माझे योगदान देणार आहे. आता एक पर्याय म्हणून भाजपा कोकणामध्ये भक्कमपणे उभी राहणार आहे असेही त्यांनी सांगिलते.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून विरोधक भाजपा आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आज परकर हॉस्पिटमध्ये जो कार्यक्रम झाला त्यावरून अशाना योग्य चपराक बसली आहे, कोकणात मुस्लिम समाजाचे मोठे योगदान आहे, इथे जातय सलोखा आहे आणि भाजपा आणि मुस्लिम समाज सोबत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

खात्याचे मंत्री उदघाटनाची जी तारीख देतात तीच अंतिम !

चिपी विमानतळ उद्घनाच्या तारखेवरून सुरु असलेल्या वादावर बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले कि नागरी हवाई उड्डाण मंत्रालय हे भाजप सरकारच्या अखत्यारीत आहेत. त्याचे मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी जी ९ ऑक्टोबर हि तारीख दिली आणि ती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाहीर केली तीच तारीख अंतिम असेल. त्यामुळे श्रेयवादापेक्षा खासदार विनायक राऊत यांनी कोकण विकासासाठी सकारात्मक काम करावे असा टोला त्याची लगावला.