तिसरी लाट येऊ नये, पण आपण सज्ज राहूया- देवेंद्र फडणवीस

जाहिरात-2
भाजप आमदारांच्या वतीने ४ कोविड सेंटर्सचे लोकार्पण

रत्नागिरी | प्रतिनिधी 

कोकणातील भाजपच्या सर्व आमदारांनी निधी देऊन कोविड सेंटर्स उभी केली आहेत. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करूया. तसेच तिसरी लाट येऊ नये, परंतु दुर्दैवाने तिसरी लाट आली तर आपण सज्ज राहिले पाहिजे. त्याकरिता व्यवस्था उभी केली पाहिजे. तसेच लसीकरण वेगाने केल्यास तिसऱ्या लाटेपासून संरक्षण मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या आहेत, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भाजपच्या कोकणातील आमदारांनी दिलेल्या निधीतून कोविड सेंटर्सचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम झाला. खंडाळा हायस्कूल, टिळक विद्यालय, दापोली, महात्मा गांधी विद्यालय, साखरपा, आबासाहेब मराठे हायस्कूल, हातीवले राजापूर येथे सेंटर्सचे उदघाटन झाले. निधी वितरणाचे पत्र देऊन लोकार्पण करण्यात आले.

या वेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी लांब जावे लागत होते, त्या वेळी मंत्री नारायण राणे यांनी जागा दिली व सव्वा कोटी रुपये खर्चून सिंधुदुर्गसाठी अत्याधुनिक पहिले सेंटर उभे केले. सरकारचे सेंटर झाले नाही पण राणे यांच्या हॉस्पीटलमध्ये हे सेंटर उभे केले. एका बाजूला तिसरी लाट येण्याची भीती असल्याने २० ते २५ हजार नागरिकांना सुविधा दिल्या जातील. दापोली, गुहागर तालुक्यालाही फायदा होणार आहे. १२० बेडचे हॉस्पीटलचे लोकार्पण, शासनात नसताना भरीव ठोस, ४ कोटी रुपये खर्च करत सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय. ही सेवा पूर्णपणे संकटाला पुरेशी पडणार नाही. पण आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. कोकणात विशेषतः लक्ष देत आहोत. सर्व आमदार, राणे परिवार कोविडच्या संकटात मदत देत आहोत. भाजपने रुग्णांना अॅडमिट करण्यापासून अगदी मृतांवरही अंत्यसंस्कार केले. राजकारणात चिखलफेक केली जाते. पण आज जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाइन माध्यमातून चांगला कार्यक्रम राबवला. कोकणाने भरभरून दिले आहे, पण दुर्दैवाने दिले नाही. आपल्याला काम करावे लागणार आहे. कोकणचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्न करूया. भविष्यात कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी काम करावे लागणार आहे. राणे यांच्याकडे उद्योग खाते आहे. त्यांच्या माध्यमातून उद्योग आणू. सर्वांनी राजकारणापलिकडे काम करू. भाजपच्या तालुकाध्यक्षांनी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. प्रसाद लाड यांनी पाठपुरावा करत काम केले.

आमदार प्रसाद लाड प्रास्ताविकामध्ये म्हणाले की, तौक्ते चक्रीवादळावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी मिश्रा, के. मंजुलक्ष्मी कोविडचे प्रमाण जास्त असल्याने व्यवस्था कमी पडते. प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर भाई गिरकर, निरंजन डावखरे, रमेश पाटील प्रसाद लाड यांच्या माध्यमातून प्रत्येकी ३५ लाखाचा निधी दिला. चार कोविड सेंटरची ऑक्सीजन पाईपलाईन, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासह केली आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी ऑक्सिजन पुरवठा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात तिसरी लाट येण्याची भिती असल्यामुळे ही सेंटर्स उभी केली आहेत. रत्नागिरीसाठी लागणारा पॅरामेडिकल स्टाफ, ऑक्सिजन गरजेप्रसंगी दिली जाईल.

माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, प्रसाद लाड यांनी कोविड सेंटर उभी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. रत्नागिरीला ज्याची गरज आहे. रत्नागिरीमध्ये आरोग्य सुविधा नाहीत. आपल्याला निर्माण कराव्या लागल्या. रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग, रायगडपेक्षा अनेक वर्षांनी मागे आहे. पायाभूत सुविधांसाठी नवे काही करण्याची गरज आहे. कोविडचे मृत्यू, पायाभूत सुविधांची वानवा आहे. ग्रामीण भागातील रस्ते खराब आहेत. अनेक विकासकामांपासून वंचित आहे, त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे.

मंत्री उदय सामंत यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी ऑनलाइन माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार भाई गिरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार रमेश पाटील, आमदार संजय केळकर उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, भाजपचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू उपस्थित होते.