कोकणात गणेशोत्सव प्रतिष्ठेचा.. मात्र महागाईचा आगडोंब, पावसाची संततधार, बाजारपेठेत वाहतुकीचा जीवघेणा खोळंबा आणि कोरोनाच्या धास्तीत दुकानदार गिर्‍हाईकाच्या प्रतीक्षेत

फळे ,सजावट साहीत्य आणि भाजीपाला.. किराणा जोशात….

फोंडाघाट। कुमार नाडकर्णी :

फोंडाघाट बाजारपेठेत सीसी.टी.व्ही कॅमेरे हतबल झाले असून तासन्तास होणारी वाहतुकीची कोंडी सणासुदीवर विपरीत परिणाम करीत आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने उत्साहावर पाणी फिरले आहे. रस्त्यावर फक्त स्थानिक ग्रामस्थांनी फळे, भाजीपाला आणि किराणामाल खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केली आहे. मात्र चाकरमानी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर अडकल्याने त्यांची अनुपस्थिती पेठेमध्ये जाणवत आहे. मात्र शेवटच्या दोन दिवसात ते देखील बाजारपेठेत दाखल होतील आणि खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाला सुरुवात होईल असे चित्र आहे.

चेक-पोस्ट/समांतर रस्ताही सतर्क

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर फोंडाघाट मध्ये प्रवेश करणाऱ्या चेक पोस्टवर आरोग्य विभाग आणि पोलिस सक्रिय झाले झाले आहेत. प्रत्येक येणाऱ्या वाहनातील व्यक्तींची विचारपूस करून लसीकरण झाले आहे का ? अथवा वैध आरटीपीसीआर टेस्टरिपोर्ट ची खातरजमा करुन शासनाचे नियमावलीची अंमलबजावणी होत आहे. फोंडा–घाट उतारावरून असलेल्या समांतर वाटेने चेकपोस्ट वरील ससेमिरा चुकत असल्याने, या वाटेला प्रवाशांनी पसंती दिल्याचे, वाटेवरील वाहनांच्या गर्दीवरून दिसते. ही बाब गेली दोन वर्षाच्या काळात प्रशासनाला माहित असूनही त्याकडे डोळेझाक जाणून-बुजून केल्याने करोना प्रतिबंध होणार का ? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शेवटच्या दोन-तीन दिवसात गणपती मुर्त्या घरोघरी नेताना, पेठेतील वाहतूक कोंडी,, ग्रामस्थांची गर्दी ग्राहकांची धांदल, दुकानदारांची लगबग, आवाज प्रदूषण यावर स्थानिक पोलीस प्रशासन जातीने लक्ष ठेवून आहेत. बाजारातील ग्राहकांचा वेध घेता महागाईचा आगडोंबाने आणि गणेशोत्सवाच्या उत्साहावर मर्यादा आल्याची चिंता व्यक्त होत आहे.मंडपीसाठी लागणारी शेरवाडे, कांगणे, बेडे, कवंडाळे यांच्या दरात अभूतपूर्व वाढ झालेली आहे. कांगणाची जोडी ५० रुपयांनी नाईलाजास्तव घ्यावी लागत असून गॅस सिलेंडर ९०० रुपये, कडधान्यांच्या दरांनी गृहीणींचे कंबरडे मोडले आहे. सजावटीच्या फुला-माळांनी, विद्युत रोषणाईच्या साहित्यांनी, आणि फळांच्या सजावटीने, सुहासिनींची सौभाग्यलेणी, अलंकार,आकर्षक फटाके, श्रींच्या प्रसादाची- मिठाई- लाडू- फुटाण्याची दुकाने ,कापड विक्रेते- दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत… शेवटच्या दिवसात गणेशोत्सवाला बहर येईल, दुकानदार- व्यापाऱ्यांना मनासारखी विक्री होऊन मालाचा उठाव होईल तसेच उत्साहाच्या गणपतीच्या आगमनाने उत्सव सुफल- संपूर्ण होईल अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त होत आहे. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून मास्क वापरताना,गर्दी टाळताना,साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे….