गणेशोत्सवात संगीतकार अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेली 7 गीते गणेशभक्तांच्या भेटीला!

“कला वैभव” युट्यूब चॅनलवर होणार रिलीज

रत्नागिरी |

रत्नागिरीतील आकाशवाणीचे ए ग्रेड मान्यताप्राप्त संगीतकार अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेली गणपती गीते गणेशोत्सवानिमित्ताने “शिवतनया विघ्नेशा” शिर्षकांतर्गत रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता गणेश चतुर्थी रोजी एकूण 7 गीते “कला वैभव अवधूत बाम” युट्यूब चॅनलवर रिलीज होणार आहेत.

“शिवतनया, गणेश पाळणा गीत, बाप्पा आला, कमानी सजवा, रत्ननगरीच्या राजा, गणपती बाप्पा सांगा, पारंपरिक आरती” अशी एकूण 7 गीते आहेत. प.पू. टेम्भे स्वामी, धरणीधर महाराज, तसेच अभिजित नांदगावकर, नितीन देशमुख, पुरूषोत्तम डोंगरे, सुनील काजारे यांनी ही गीते लिहिलेली आहेत. या गणपती गीतांचे बहुतांश गीतकार, गायक कलाकार हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील आहेत.

ही गीते गायक स्वप्नील गोरे, दिव्या आपटे, ज्ञानेश्वरी चिंदरकर, करुणा रानडे-पटवर्धन, अभिजीत भट, अभिषेक भालेकर यांच्या आवाजात स्वरबद्ध झाली आहेत. याचे संगीत संयोजन निशांत लिंगायत व गणेश घाणेकर यांनी केले असून तबलासाथ अभिषेक भालेकर, पखवाज साथ प्रथमेश तारळकर यांची आहे. तर लेखन व निवेदन अनुया बाम यांचे असून गीतांसाठी शास्त्रीय गायक प्रसाद गुळवणी यांचे संगीत मार्गदर्शन लाभले आहे. यासाठी प्रसन्न दाते यांचे विशेष तांत्रिक सहाय्य लाभले आहे. तरी रसिकांनी गणेशोत्सवात जरूर या गीतांचा आस्वाद घेण्याचे आवाहन संगीतकार अवधूत बाम यांनी केले आहे.