गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडणगड नगरपंचायतीने शहरातील रस्त्यांतील खड्डे बुजवून केली डागडुजी

मंडणगड | प्रतिनिधी :

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडणगड नगरपंचायतीने शहरात वाढणारी वर्दळ, वाहतूक लक्षात घेवून शहरातील रस्त्यांतील खड्डे बुजवणे, शहरातील स्वच्छता, शहरातील दुकानांच्या समोरील गटार स्वच्छता आदि कामे हाती घेतली आहेत. दि. ३ ऑगस्ट रोजी नगरपंचायतीच्या वतीने शहरातील मुख्य चौकात, व शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे कॉंक्रीटच्या सहाय्याने बुजवून रस्त्यांची डागडुजी केली.

मंडणगड नगरपंचायत मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी स्वच्छता व्यवस्था व शहरातील अन्य समस्यासंदर्भातील निराकरणासाठी पुढाकार घेतला आहे, गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेवून कोरोना निमावालीच्या व्यापारी वर्गाला योग्य सूचना, पार्किंगची व्यवस्था आदींबाबतही नियोजन करण्यात आले आहे. प्रभागांमधील स्वच्छतेवर अधिक भर देण्याचे नियोजन आहे. नुकतेच नगरपंचायत अखत्यारीत येणाऱ्या गांधी चौक व कोंझर येथील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मिळावे यासाठी नगरपंचायतीच्या वतीने बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला आहे.

दरम्यान शहरातील मुख्य चौक व अन्य मार्गावरील रस्त्यांतील खड्डे बुजवून डागडुजी केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.