सिद्धार्थ देसाईला तेलुगू टायटन्सनं १.३० कोटींत संघात कायम राखले, प्रदीप नरवाल ठरला सर्वात महागडा खेळाडू!

जाहिरात-2

कोरोना व्हायरसमुळे मागच्या वर्षी न झालेली प्रो कबड्डी लीग यंदा परतणार आहे

कोरोना व्हायरसमुळे मागच्या वर्षी न झालेली प्रो कबड्डी लीग यंदा परतणार आहे. त्यासाठी खेळाडूंची लिलाव ( PKL Auctions )  सुरू असून प्रदीप नरवालनं प्रो कबड्डी लीगमध्ये सर्वात महागड्या खेळाडूचा मान पटकावला. पाच पर्वांत पाटना पायरट्सकडून खेळणारा प्रदीप नरवाल आता यूपी योद्धा संघाकडून खेळणार आहे. उत्तर प्रदेशच्या या संघानं प्रदीपसाठी १.६५ कोटी रुपये मोजले. यापूर्वी पाटना पायरट्सचा माजी स्टार खेळाडू मोनू गोयत याच्यासाठी सहाव्या पर्वातील लिलावात १.५१ कोटी मोजले गेले होते आणि तो विक्रम प्रदीपनं मोडला.

प्रदीप नरवाल हा PKL मधील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्यानं एकूण ११६९ गुण कमावले आहेत. चढाईत त्यानं सर्वाधिक ११६० गुण कमावले आहेत. त्याच्या ८८० चढाई यशस्वी ठरल्या आहेत आणि ५३ वेळा त्यानं सुपर रेड केल्या आहेत. ५९ सामन्यांत त्यानं सुपर १० गुण घेतले आहेत. तेगुलू टायटन्सनं १.२ कोटींची बोली लावून सर्वांना धक्का दिला होता, परंतु यूपी योद्धानं बाजी मारली.  आता प्रदीप नरवाल सुमित, नितेश कुमार, सुरेंदर गिल, आशू सिंग आणि नितीन पनवर यांच्यासोबत खेळणार आहे. यूपी योद्धाकडे आता चार चढाईपटू, तीन बचावपटू आणि एक अष्टपैलू खेळाडू आहेत.

प्रदीपला घेण्याची संधी गमावल्यानंतर तेलुगू टायटन्सनं त्यांचा मोर्चा महाराष्ट्राच्या सिद्धार्थ देसाईकडे वळवला. त्यांनी १.३० कोटींत सिद्धार्थला आपल्या ताफ्यात कायम राखले. प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वात सिद्धार्थनं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. यू मुंबा संघाकडून खेळताना त्यानं चढाईचे सर्वात जलद २०० गुण कमावण्याचा विक्रम केला. त्या पर्वात त्यानं २१ सामन्यांत २१८ गुण कमावले. शिवाय सर्वात जलद ५० गुणांचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.  त्यानंतर ७व्या पर्वात त्याच्यासाठी तेलुगू टायटन्सनं १.४५ कोटी मोजले. त्या पर्वा त्यानं २२ सामन्यांत २२० गुण ( २१७ चढाई व ३ पकड) कमावले.