…म्हणून ३० ऑगस्टपर्यंत अमेरिका आपला राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवणार; जाणून घ्या अफगाणिस्तान कनेक्शन

जाहिरात-2

३० ऑगस्ट संध्याकाळपर्यंत अमेरिकेचा ध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे.

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू आहे. अशातच गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले. मृतांपैकी १३ जण अमेरिकेचे कर्मचारी आहेत. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या सन्मानार्थ ३० ऑगस्ट संध्याकाळपर्यंत अमेरिकेचा ध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे. व्हाईट हाऊसकडून ही माहिती देण्यात आली आहे.

काबूलमधील हल्ल्यांनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला काही वेळ मौन बाळगून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “हे कोणी घडवून आणलं आहे याचा अंदाज आपल्या सर्वांनाच आहे पण त्याबद्दल आपल्याला अद्याप खात्री नाहीय,” असं बायडेन यावेळी म्हणाले.

तसेच या हल्ल्यांनंतरही अमेरिकेकडून सुरू असणारी बचाव मोहीम सुरू राहणार असल्याचं बायडेन यांनी स्पष्ट केलं आहे. “आम्ही सर्व अमेरिकन नागरिक, आम्हाला सहकार्य करणारे अफगाणिस्तानमधील आमच्या सहकाऱ्यांची सुखरुप सुटका केली जाईल,” असं बायडेन म्हणालेत.

इस्लामिक स्टेटने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी..

काबूल विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेट (IS) ने स्वीकारली आहे. या संघटनेने काबूल विमानतळाच्या गर्दीच्या गेटवर स्फोट घडवलेल्या आत्मघातकी हल्लेखोराचा फोटोही प्रसिद्ध केला आहे. इस्लामिक स्टेटने आपल्या दाव्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या फोटोवरुन हा हल्ला करणारा तोच हल्लेखोर होता असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी तालिबानने धमकावलं..

३१ ऑगस्टनंतरही तुमचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये राहिल्यास त्याचे परिणाम अमेरिकेवर होतील, अशा शब्दांत तालिबानने अमेरिकेला धमकावलं होतं. शिवाय सैन्य हटवण्यासाठी तालिबानने ३१ ऑगस्टची ही शेवटची मुदत अमेरिकेला दिली होती.