ओणी दैतवाडी दुकान फोडून रोख रक्कम व किराणा मालाची चोरी

राजापूर |वार्ताहर

अज्ञात चोरटयांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ओणी दैतवाडी येथील किराणा दुकान फोडून दुकानातील रोख रक्कमेसह किराणा माल लंपास केल्याची घटना  १६ ते १७ ऑगस्ट रोजी घडली आहे. या घरफोडीत अज्ञात चोरटयांनी रोख रूपये सात हजार पाचशे व रूपये ३४ हजार ८०० रूपयांचा किराणा माल लंपास करून पोबारा केल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी निर्मला सखाराम दैत (५३) रा. ओणी दैतवाडी यांनी राजापुर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून राजापूर पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरोधात भादवि कलम ४५४,४५७ व ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

१६ ऑगस्ट रात्रौ ८ ते १७ ऑगस्ट सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली आहे. या कालावधीत दुकान बंद असताना अज्ञात चोरटयांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुकानाचे वरील छपराचे कौले काढुन दुकानात प्रवेश केला. व दुकानातील लॉकरमध्ये ठेवलेली रोख रूपये ७ हजार ५०० रूपयांची रक्कम तसेच दुकानातील ३४ हजार ८०० रूपयांचा जिन्नस माल लंपास केल्याचे फिर्यादीने या तक्रारीत नमूद केले आहे.

याप्रकरणी राजापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला व अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार श्री. हरजकर करीत आहेत.