कोकणात जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या सुरू करा!

गणेशोत्सवानिमित्त प्रवासी संघटनेची मागणी

खेड | प्रतिनिधी :

गणेशोत्सव महिन्यावर आल्याने कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. कोकणात जाणाऱ्या दैनंदिन, साप्ताहिक आणि विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या नावाखाली बंद केलेल्या वसई- सावंतवाडी, दिवा-सावंतवाडी व इतर पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.

पॅसेंजर गाड्या रद्द केल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांचा यात अधिक वेळ आणि पैसा खर्च होत आहे. कोरोनामुळे मुंबई-पुणे, मुंबई-नागपूर, मुंबई- नाशिक, मुंबई-कोकण यासह मुंबई आणि राज्यातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या पॅसेंजर ट्रेन बंद असल्याने राज्यातील विविध भागातून मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अनेक
अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी
संघटनेने केली आहे.

मध्य रेल्वेपेक्षा पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात जाणाऱ्या गाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे।पश्चिम रेल्वेच्या भागात राहणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी दादर, सीएसएमटी, ठाणे येथे जावे लागते. त्यामुळे वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल, बोरिवली, वलसाड येथून गाड्या सोडाव्यात, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे.

जाहिरात4