८० वर्षाच्या जेष्ठ नागरीकाचे प्राण वाचविणा-या पोलीस अंमलदारांचे अधीक्षकांनी केले कौतुक

रत्नागिरी । प्रतिनिधी
सध्याच्या पावसाळी दिवसांमध्ये तुडुंब भरून वेगाने वाहणाऱ्या नदीमध्ये उतरणे धाडसाचेच! परंतु याचा कोणताही विचार न करता गड नदीच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या वृद्धाला वाचविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस अंमलदारांचा त्याच्या धाडसाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सत्कार करून कौतुक केले.

दिनांक 16/07/2021 रोजी राजाराम आत्माराम घाग (80 वर्षे, रा. नायशी, हे संगमेश्वर) येथील कोंडीवरे धरण परिसरात रस्त्याने पायी जात असताना तोल जाऊन गड नदीच्या प्रवाहात पडले होते. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहाने ते नदीच्या मध्यभागी खेचले व पाण्यासोबत वाहत जावु लागले. त्यावेळी त्यांनी मोठ-मोठ्याने मदतीसाठी याचना करीत होते. मात्र दुथडी भरुन वाहणा-या नदीच्या पाण्याच्या आवाजात त्यांचा आवाज पोहोचत नव्हता.

दरम्याने संगमेश्वर पोलीस ठाण्यामधील नियुक्तीस असलेले होमगार्ड तुषार जड्यार यांना रस्त्याने जाताना गड नदीच्या मध्यभागी एका झुडपाला एक वयोवृद्ध इसम आडकलेला दिसल्याने त्यांनी तत्पर्तने माखजन दुरक्षेत्र अंमलदार सहाय्य्यक पोलीस फौजदार प्रशांत शिंदे, महिला पोलीस शिपाई तेजस्वीनी गायकवाड यांना तात्काळ फोन वरुन माहिती दिली. त्याचवेळी राजाराम आत्माराम घाग यांना हातवारे करून झाडाचे फांदीला घट्ट पकडण्यास सांगितले.

सदरची माहिती मिळताच माखजन दुरक्षेत्राचे अंमलदार प्रशांत शिंदे, महिला पोलीस शिपाई तेजस्वीनी गायकवाड तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पोलीस मित्र अमित कुंभार, तुकाराम कुंभार, किर्तीराज सागवेकर यांनी सर्वांनी आपला स्वत:चा जीव धोक्यात घालुन धोकादायक वाहणा-या नदीपात्रात उतरुन नदीपात्रत मध्यभागी झाडाला अडकून पडलेले राजाराम घाग यांना मदतीसाठी रस्सी पाठवून त्यांना नदीच्या प्रवाहातुन सुखरुप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.

पोलीस अंमलदार यांनी कर्तव्यतत्परता व समयसुचकता दाखवुन स्वत:चा जीव धोक्यात घालुन 80 वर्षाच्या जेष्ठ नागरीकाचा जीव वाचविल्याने डॉ. मोहित कुमार गर्ग, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात गौरव चिन्ह देऊन सन्मानित केले व भविष्यात अशाच चांगली कामगीरी करण्याच्या शुभेच्छा दिल्या.