दापोलीचे जावई इंडोनेशियन संकटातून सुखरूप परत

जाहिरात-2
केंद्रीय गृहमंत्रालय आणि भारतीय विदेश मंत्रालयाच्या अथक प्रयत्नांना यशस्वी

दापोली । प्रसाद रानडे

दापोलीतील सर्वात जुने मिठाईचे व्यापारी श्री पेठे यांचे पुणे स्थित जावई श्री. ठाकूर मर्चंट नेव्ही मध्ये उच्च पदावर आहेत. त्यांचे जहाज इंडोनेशियाच्या जवळ असताना ठाकूर यांना तब्बेतीच्या तक्रारीमुळे भारतात पाठवण्यासाठी इंडोनेशियात उतरवण्यात आलं. तिथून त्यांना विमानतळावर नेताना स्थानिक शिपिंग एजंटच्या चुकीमुळे इंडोनेशियन पोलिसांनी ठाकूर यांच्यासह अन्य १५ जणांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांची सर्व कागदपत्रे आणि मोबाईल जब्त केले. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे कंपनी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे नातेवाईक गोंधळून गेले. त्यात इंडोनेशियन पोलिसांनी त्यांना कुटुंबियांजवळ संपर्क करू नं दिल्याने परिस्थती अजून गुंतागुंतीची झाली.

अखेर हा विषय मूळचे दापोली तालुक्यातील आणि सध्या केंद्रीय गृहमंत्रालयाशी संलग्न एका संस्थेचे संचालक विनय जोशी यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पोचला. गृहमंत्री शहा यांनी हा विषय वैयक्तिक पातळीवरून भारतीय विदेश मंत्रालयात पाठवला आणि मग इंडोनेशियातील भारतीय दूतावासाने वेगवान पावले उचलत प्रकरण सोडवण्याच्या दृष्टीने आपला एक राजनैतिक अधिकारी या भारतीय लोकांसोबत चौवीस तास तैनात केला. विदेश मंत्र्यांचे सचिव सोहनलाल यांनी दिल्लीहून प्रकरणाचा रोज पाठपुरावा चालू ठेवल्याने अखेर इंडोनेशियन पोलिसांनी या भारतीयांच्या सुटकेच्या दृष्टीने आवश्यक तपास आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून हे सर्व फसलेले भारतीय काल भारतात परतले आणि मोठ्या काळाच्या चिंता आणि अनिश्चिततेच्या वातावरणातून सर्व कुटुंबे बाहेर पडली.

सर्व भारतीय सुखरूपपणे भारतात पोचल्यावर भारतीय विदेश मंत्रालयाने इंडोनेशियन सरकारचे आभार मानले आहेत. आधी स्व. सुषमा स्वराज आणि आता एस जयशंकर विदेशमंत्री असताना जगभरातल्या भारतीय दूतावासांची कार्यक्षमता आणि दबदबा पहिल्यापेक्षा कित्येक पटींनी वाढल्याचाच हा पुरावा आहे.