वादळामुळे बंद झालेली आंजर्लेमार्गे केळशी एस.टी. बससेवा सुरू

जालगांव | वार्ताहर

निसर्ग वादळामुळे झालेल्या उधाणात पाडले उभी धोंड येथील रस्त्याचा भराव वाहून गेला होता. त्यानंतर या मार्गावरील एस.टी.ची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या वादळानंतर दापोली दौऱ्यावर आलेले खा.सुनिल तटकरे यांनी हा मार्ग त्वरीत दुरूस्त करावा असे निर्देश दिले होते. तर आंजर्लेचे उपसरपंच श्री.महाडीक यांनी या मार्गावरून एस.टी. वाहतूक सुरू व्हावी यासाठी उपोषण केले होते. मात्र रस्ता दुरूस्तीबाबत कोणतीही कार्यवाही होत नव्हती.
नुकतेच दापोली दौऱ्यावर आलेले खा.सुनिल तटकरे यांना रस्ता दुरूस्तीबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी बांधकाम विभागाला त्वरीत रस्त्याचे काम पूर्ण करावे असे आदेश दिले होते. त्यानंतर बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेतले.

त्यानुसार दापोली आगाराच्या आगार प्रमुख श्रीम.जाधव, वाहतूक नियंत्रक श्री.नाफडे, पाडले सरपंच रविंद्र सातनाक, उपसरपंच सेजल मयेकर, सदस्य योगेश लिमये, उषा पालशेतकर व आडे-पाडले ग्रामस्थांच्या उपस्थितीत या मार्गाची पाहणी करण्यात आली व पाहणीनंतर दि. 24 जून पासून सकाळी 8 वा. दापोली आंजर्लेमार्गे केळशी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे आंजर्ले, पाडले ग्रामस्थांना एस.टी. चा लाभ होणार आहे.